राजकारणाचा भरणार का बाजार की केवळ ठरणार ‘वल्गनाच’

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
elections : जिल्ह्यातील 10 नगर परिषद व एका नगर पंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचा कार्यक्रम जाहीर होणे अजून बाकी आहे. तरीही जिल्ह्यात तापलेल्या राजकीय वातावरणाचा उपयोग करून घेत मारेगाव येथील अनेक इच्छुकांनी जिप व पंससाठी आपणच उमेदवार म्हणून आपल्या उमेदवारीची जाहिरात करणे सुरू केलेले आहे. सध्या संभाव्य उमेदवारांची सुरू असलेली जाहिरात ही त्यांची संभाव्य उमेदवारी ही केवळ वल्गना ठरते की ताठ मानेने निवडणुकीला सामोरे जाते हे येणाèया काळामध्ये कळणारच आहे.
 
 

election 
 
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जसा जाहीर झाला तशा संभाव्य उमेदवारांच्या उड्या या समाज माध्यमांवर दिसून येऊ लागल्या. ज्यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवलेली नाही, ज्यांना निवडणुकीचा कोणताही अनुभव नाही, तेही मीच उमेदवार या अविर्भावामध्ये आपल्या स्वतःच्याच जाहिराती करताना दिसून येत आहे.
 
 
यात काही जणांनी तर खूपच मोठ्या उड्या मारलेल्या दिसून येत आहे. भावी नपं अध्यक्ष, भावी नगरसेवक, जनतेच्या मनातला, जनतेच्या हाकेला ओ देणारा, खरा कार्यकुशल, विकासाचा महामेरू, जनतेचा कैवारी अशी वेगवेगळी बिरूदे आपल्याभोवती लावून आपणच कसा योग्य उमेदवार आहोत हे जनतेला ठासून सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
 
 
सद्य परिस्थितीत राजकारण हा व्यवसाय झालेला आहे. अनेकजण आपली उपजीविका म्हणून याकडे बघत असतात. तर ज्यांना समाजसेवेची आवड आहे ते राजकारणाकडे समाजसेवा म्हणून बघत असतात. राजकारणाचा उपयोगही सामाजिक सेवेसाठी आणि अडल्या-नडल्यांच्या, गोरगरीब लोकांच्या, जनतेच्या सेवेसाठीच करत असतात. परंतु या जाहिरातबाजीमध्ये मात्र खरे जनतेचे कैवारी लोप पावलेले दिसतात.
 
 
निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या धामधुमीतही ते जनतेची खरी सेवा करण्यातच मग्न आहेत. तर काही केवळ वल्गना करण्यातच मग्न आहे. बघूया जनता कोणाला साथ देतात, कोणासोबत राहतात. जाहिरातबाजी किंवा वल्गना करून स्वतःचा स्वार्थ साधतात की, खरोखरच निवडणुकीला उभे राहून जनतेच्या दरबारात मत मागायला जातात, हे मात्र येणारा काळच सांगणार आहे.