वेध..
विजय निचकवडे
prashant damale आम्ही म्हणतो नाटकं करू नकोस! पण, ते नाटकं करूनच मोठे झाले. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला वेगळी उंची आणि सन्मान मिळवून दिला. मराठी रंगभूमीची गत चार दशकांपासून सेवा करताना ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हे प्रत्येक मराठी माणसाला गुणगुणण्यास भाग पाडणारा व्यासंगी म्हणजे प्रशांत दामले! मराठी रंगभूमीवर सर्वाधिक नाट्य प्रयोगांचा विक्रम साकारणारा हा अष्टपैलू कलावंत 16 नोव्हेंबरच्या प्रयोगानंतर ‘विक्रमादित्य’ होईल अन् मराठी रंगभूमीचा, नाट्यसृष्टीचा अभिमानच ठरेल.
आमच्या लेखी ‘नाटकं’ करणे म्हणजे जरा वेगळं आहे. पण काही नाटकं अशी असतात, जी स्वतःसोबत त्या क्षेत्रालाही समृद्ध करतात. मराठी रंगभूमी आणि नाट्यसृष्टीच्या इतिहासात गत चार दशके म्हणजेच जवळपास 42 वर्षांपासून सेवा देताना अनेक आघाड्यांवर परिस्थितीचा सामना करीत स्वतःला सिद्ध करणारा कलावंत प्रशांत दामले. 16 नोव्हेंबर रोजी पुणे येथे आयोजित नाट्य प्रयोग हा प्रशांत दामले यांच्या आयुष्यातील 13,333 वा आहे. हाच प्रयोग त्यांना मराठी रंगभूमीवर सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा कलावंत म्हणून ‘विक्रमादित्य’ करणारा असेल. हा विश्व विक्रमी प्रयोग म्हणजे मराठी रंगभूमीला बहुमान मिळवून देणारा असाच म्हणावा लागेल.
एकीकडे मराठी चित्रपटसृष्टी असो की नाट्यक्षेत्र, दोन्ही बाबतीत फारशी सकारात्मकता दिसत नसताना आपल्या कलेच्या, सहजसुंदर अभिनयाच्या आणि विनोदी शैलीच्या जोरावर रंगभूमी समृद्ध करण्याचे काम प्रशांत दामले यांनी केले. मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप त्यांनी पाडली. 27 हून अधिक नाटकांमध्ये मुख्य भूमिकेत असलेला हा कलावंत कधी मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवून गेला कळलेच नाही. 1983 साली नाट्य क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर एकाहून एक अजरामर नाटकांची मेजवानी देणारा हा कलावंत स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्याची भक्कम गोळा बेरीज करीत पुढे जात राहिला. मराठी रंगभूमीला प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर, रमेश देव, सतीश दुभाषी अशा प्रतिभावंतांचा वारसा आहे. तो जपण्याचे काम आपल्या सहज अभिनयातून प्रशांत दामले यांनी केले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एखादा कलावंत स्वतःच्या मर्यादा आखून ठेवतो; मात्र डेली सोपसारख्या उपक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात वहिनींचे लाडके झालेले भाऊजीही काही कमी नाहीत.
27 हून अधिक नाटकांमधून प्रमुख भूमिका करताना नाट्यसृष्टी गाजविणाऱ्या या कलावंताने कारकीर्दीतील 12,500 वा प्रयोग केला तो, ‘एका लग्नाची गोष्टी’ नाटकाचा. याच नाटकातील ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या गाण्याने महाराष्ट्राला, मराठी प्रेक्षकाला वेड लावले. कदाचित तेव्हापासून आमच्या सारखा प्रेक्षक असलेला मराठी माणूस प्रशांत दामले या नावात आपलं सुख शोधू लागला. 6 नोव्हेंबर 2022 मध्ये रोजी हा 12,500 प्रयोगांचा टप्पा गाठला. 2024 पर्यंत विविध नाटकांचे 13,210 प्रयोग सादर करून नाट्यप्रेमींची भूक भागविणारा हा कलावंत आता विक्रमादित्य होतो आहे.prashant damale 16 नोव्हेंबर रोजी पुण्यात होणारा त्यांचा प्रयोग 13,333 वा आणि नाट्यसृष्टीत विश्वविक्रमाची नोंद करणारा आहे.
मराठी रंगभूमीला लाभलेला या व्यासंगी कलावंताने केलेली रंगभूमीची सेवा नक्कीच रंगभूमीसाठी मोलाची ठरावी. निरागस भाव, साधेपणा आणि आपुलकी अशा मिश्रणातून तयार झालेल्या या कलावंताने आपल्या प्रतिभेच्या जोरावर मराठी नाट्यसृष्टीला समृद्ध केले हे तेवढेच खरे! विक्रमादित्य होत असताना प्रेक्षकांशी असलेलं आपुलकीचं नातं मात्र तेवढ्याच आत्मीयतेने हा व्यासंगी जपून आहे. एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचत असताना मराठी बाणा आणि नाट्य संस्कृती जपणाèया या बहुआयामी कलावंताचा अभिमान बाळगलाच गेला पाहिजे. आजही ग्रामीण भागातील नाट्य संस्कृती अशाच कलावंतांचा आदर्श पुढे ठेवून अखंडपणे जपली जात आहे. कदाचित प्रशांत दामले यांना विक्रमादित्य करणारा त्यांच्या आयुष्यातील टप्पा नाट्य संस्कृतीशी नाळ जुळलेल्या अनेकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा असेल. शेवटी प्रशांत दामले या नावातच तर दर्दी प्रेक्षकांचे ‘सुख’ दडलयं ना!
9763713417
...