बार्शी,
student hanged himself बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन सचिन काटकर (वय १६) या दहावीतील विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर तो घरी आला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. आई आणि आजोबा शेतीकामासाठी शेतात गेले होते, तर आजी कार्यक्रमासाठी बार्शी येथे गेली होती. वडील दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी येथे गेले असल्याने घरात तो एकटाच होता.

दुपारी शाळेत परत न गेल्याने मित्रांनी त्याला पाहण्यासाठी घरी भेट दिली असता, आर्यनने घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेला दिसला. मुलांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने शेजारील लोक घरात धावून आले. आर्यनला तत्काळ बार्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती बार्शी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती अडसूळ यांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत. या अचानक घडलेल्या घटनेने कुसळंब परिसरात शोककळा पसरली आहे.