मानोरा,
Taluka Agriculture Officer Solanke नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकर्यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून कृषी ताईची भूमिका अत्यंत महावाची असल्याचे प्रतिपादन सहायक कृषी अधिकरी तथा मास्टर ट्रेनर एम.डी.सोळंके यांनी मानोरा येथील कृषीताई च्या कार्यक्रमात केले. पंचायत समिती मानोरा येथे नुकतेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत महिला शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी आणि प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कृषी विभागाच्या वतीने कृषीताई साठी खास आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात महिला शेतकर्यांमध्ये जनजागृती वाढवणे, सेंद्रिय निविष्ठा निर्मितीची सोपी तंत्रे, मानक कार्यप्रणाली तसेच हवामान अनुकूल शेती पद्धती या महत्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच, शेतकर्यांना कृषीविषयक माहिती अधिक वेगाने व प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ’महाविस्तार अॅप्सच्या उपयोगितेची सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक तथा तांत्रिक प्रशिक्षक सहाय्यक कृषी अधिकारी एम.डी.सोळंके, यांनी सांगितले की, पोकरा २.० प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकर्यांना, विशेषतः महिला शेतकर्यांना, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सक्षम करणे आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल घडवून आणणे हा आहे. कृषी ताईंना त्यांच्या कार्यासाठी प्रेरित करत, शेतकर्यांपर्यंत प्रकल्पाचे लाभ पोहोचवण्याचे आवाहन केले. यावेळी प्रशिक्षण वर्गाला तालुका कृषी अधिकारी मानोरा, रोशन भागवत, उमेश राठोड मंडळ कृषी अधिकारी, रवींद्र सवणे, सामाजिक प्रशिक्षक अर्चना महल्ले यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचा शेवट चर्चासत्राने झाला, ज्यामध्ये कृषी ताईंनी विविध शंकांचे निरसन केले. हा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम महिला शेतकर्यांना आधुनिक, शाश्वत आणि हवामान अनुकूल शेती पद्धती आत्मसात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला अशी भावना उपस्थित कृषी ताईंनी व्यक्त केली. चित्रफितीद्वारे कृषीताई यांना महिलांनी कृषी क्षेत्रात केलेल्या आमूलाग्र बदलाचे व्हिडीओ, शेतकरी यशोगाथा दाखवण्यात आल्या. कार्यक्रमासाठी पोकरा गावातील उप कृषी अधिकरी, सहायक कृषी अधिकरी यासह सर्व कृषीताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी केले.