नागपूर,
Tarun Bharat Initiative : कार्तिक मासातील पहाटेची गुलाबी थंडी, आकाशाला कवेत घेणाऱ्या गगनजुईच्या पानाफुलांतून उन्हाचे काेवळे कवडसे जमिनीवर उतरत हाेते, याच फुलांचा काेवळा गंध वातावरणात हलका हलका बहरत हाेता, मध्येच ‘बुच’चे एक-एक फुल गिरकी घेत जमिनीवर अलगद उतरत हाेते, अशा या सुरेख वातावरणात ‘बुच’ फुलांचा उत्सव काचीपुरा ते दीक्षाभूमी मार्गावरील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या पदपथावर रंगला. या झाडाचे महत्त्व आणि फुलांच्या अंतरंगाचे पदर उपस्थितांसमाेर उलगडत गेले.
निमित्त हाेते दै. तरुण भारतच्या शताब्दीनिमित्त आयाेजित ‘पावले ही फुलांची’ उपक्रमाचे. आज या उपक्रमांतर्गत बुच नावाच्या झाडाचा आणि झाडांमुळे परिचित असलेल्या काचीपुरा ते दीक्षाभूमी या मार्गाचाही उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात गार्डन क्लबच्या उपाध्यक्ष डाॅ. राजश्री बापट, ऑरा कन्झर्वेशन पार्कचे संस्थापक अंबरीश घटाटे, निसर्गप्रेमी डाॅ. वृंदा जाेगळेकर यांनी बुच या झाडाचे शास्त्रीय व पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगत अज्ञात असलेल्या बाबी उपस्थितांसमाेर सांगितल्या. सुप्रिया पाठक यांनी बुच फुलावरील नाशिक येथील साेनाली तेलंग यांची कविता सादर केली.
गेल्या दाेन दशकांच्या काळात विविध प्रकारच्या फुलाझाडांनी बहरलेले रस्ते नागपूरकरांना शहरातील नैसर्गिक साैंदर्याची अनुभूती देत आहेत. दै. तरुण भारतच्या शताब्दी वर्षाचे निमित्त साधून नागपूरकरांना या देखण्या आणि सुगंधी वैभवाची प्रत्यक्षानुभूती देण्यासाठी ‘पावले ही फुलांची’ हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. दीपा पान्हेकर, रासेयाे अधिकारी प्रा. अंकित पुसदकर आणि प्रा. प्रफुल्ल ब्राह्मणे यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. नागपूर मेट्राेचेही कार्यक्रमाला सहकार्य लाभले. दै. तरुण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, महाव्यवस्थापक देवेंद्र टाेणपे यांच्यासह श्रीगाैरी घटाटे, नीता केकरे, अंंजली साठे, वृषाली शिलेदार, चारुता पिंपळापुरे, लक्ष्मी घटाटे, नरेश हिवरखेडकर, अपर्णा चव्हाण, वर्षा देशपांडे, मिलिंद केकरे, अशाेक पाठक, सुलाेचना पाठक यांच्यासह नागरिक आणि मातृ सेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित हाेते.
अन् याला बुच नाव पडले : घटाटे
बुचाचे झाड हे उंच वाढते आणि त्याच्या फुलांचे घाेस हे उलटे लटकलेले असतात. त्यामुळे आकाशगंगा, आकाशजुई, गगनजुई, लटकचांदणी अशा नानाविध नावांनी हा वृक्ष ओळखला जाताे. मिलेंगटाेनिया हार्टेन्सिस असे शास्त्रीय नाव असलेल्या या झाडाला ‘इंडियन काॅर्क ट्री’ संबाेधले जाते. असे असतानाही बुच नाव कसे, असा प्रश्न अनेकांना पडताे. यावर माहिती देताना अंबरीश घटाटे यांनी सांगितले, इंग्रजांनी या झाडाच्या खाेडांचा उपयाेग वाईनच्या बाटल्यांची बुचे बनविण्यासाठी केला. तेव्हापासून याला बुच हे नाव पडले. उष्ण आणि दमट वातावरणात वाढणाऱ्या या झाडांच्या सुगंधामुळे मानसिक आराेग्य सुधारण्यास मदत हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.
साध्या साेप्या श्रीमंतीपासूनही आपण दुरावलाे : डाॅ. राजश्री बापट
पावले ही फुलांची हा उपक्रम आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेणारा असल्याचे सांगतानाच डाॅ. राजश्री बापट यांनी खरा श्रीमंत काेण हे अतिशय साेप्या शब्दात सांगितले. त्या म्हणाल्या, ज्याच्या घरी फुले फुलली आहेत, दारी वेल चढले आहेत, पूर्वेची किंवा पश्चिमेची सूर्यकिरणे ज्यांच्या घरी रेंगाळतात, घरात शेतातील धान्य शिजते, घरच्या चार कारल्याची भाजी भाेजनात आहे ताे खरा श्रीमंत. पण ही साधी साेपी श्रीमंतीही आज आपण गमावून बसलाे आहे. निसर्गाच्या जवळ नेणाऱ्या अशा उपक्रमांत सहभागी हाेत बुचच्या निमित्ताने निसर्गाशी पुनर्भेट घेण्याची संधी सर्वांना मिळाल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच आशय प्रकट करणाऱ्या सुरेख कविता त्यांनी यावेळी सादर केल्या.
आसमंत डाेळसपणे बघायला शिकविणारा उपक्रम : डाॅ. जाेगळेकर
दूरच्या अनेक गाेष्टींकडे आपण लक्ष देत असताे. परंतु आसपासच्या गाेष्टी व जवळचा निसर्गच आपण बघत नाही व अनुभवतही नाही. त्यामुळे आपल्या आसपास सध्या कुठली झाडे फुलली आहेत, कुठल्या झाडांचा गंध वातावरणात पसरला आहे, ती झाडे काेणती याची माहिती आपल्याला नसते. ‘पावले ही फुलांची’ आपल्याला आसमंत डाेळसपणे बघायला शिकवीत असल्याचे मनाेगतात डाॅ. वृंदा जाेगळेकर म्हणाल्या. युवांनी पर्यावरणाचे विविध कंगाेरे वैज्ञानिकतेसह आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टीनेही जाणून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया
तरुण भारतचा उपक्रम हा निसर्गभान राखणारा असून निसर्गाच्या सानिध्यातच राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शहारातील फुलांची इतंभूत माहिती हा भविष्यातील ठेवा आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा