तिरुमला,
Tirupati Laddu controversy आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट तुपाच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदुत्व आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी ‘सनातन धर्म चाचणी मंडळ’ स्थापन करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पवन कल्याण म्हणाले की, “सनातन्यांच्या भावना, परंपरा आणि श्रद्धेची थट्टा केली जात आहे. यामुळे केवळ भक्तांच्या भावना दुखावल्या जात नाहीत, तर जगभरातील हिंदू समाजाच्या श्रद्धेलाही धक्का पोहोचतो.” त्यांनी पुढे म्हटले की, “तिरुमला तिरुपती देवस्थानम हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते एक पवित्र आध्यात्मिक प्रवास आहे. तिरुपतीचा लाडू हा फक्त गोड पदार्थ नसून तो एक सामायिक भावना आहे.
दरवर्षी सुमारे २५ दशलक्ष म्हणजेच दोन कोटी पन्नास लाख भाविक तिरुपतीला भेट देतात. अशा वेळी, धार्मिक भावना आणि पद्धतींवर केलेली थट्टा ही असह्य असल्याचे पवन कल्याण यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, धर्मनिरपेक्षता ही एकतर्फी नसून द्विमार्गी असली पाहिजे. आपल्या श्रद्धेचा आदर राखणे आणि तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. उपमुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, सर्व भागधारकांच्या संमतीने ‘सनातन धर्म चाचणी मंडळ’ स्थापन केले पाहिजे. आपल्या सनातन धर्माचे रक्षण आणि संवर्धन याबाबत तडजोड होऊ शकत नाही. हजारो वर्षांची ही परंपरा जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे, आणि तिच्या पवित्रतेसाठी आता ठोस पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, तिरुपती लाडूमध्ये वापरल्या गेलेल्या तुपाच्या भेसळीबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवन कल्याण यांनी एका मीडिया अहवालाचा हवाला देत म्हटले की, २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल २५० कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप लाडूंसाठी वापरले गेले. या प्रकरणात तिरुमला तिरुपती देवस्थानमचे माजी कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांची विशेष तपास पथकासमोर चौकशी करण्यात आली आहे. एसआयटीने टीटीडीचे माजी अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले असून, त्यांनी १५ नोव्हेंबरनंतर हजर राहण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपीने या प्रकरणावर माजी वायएसआरसीपी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. टीडीपीने म्हटले की, तूप बनवण्यासाठी गाईचे दूध आवश्यक असते, पण वायएसआरसीपी सरकारच्या काळात लाडूंमध्ये वापरले जाणारे तूप हे रसायने, प्राण्यांची चरबी आणि कृत्रिम तेलांपासून बनवले जात होते.