मुंबई,
राज्यातील गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, भाजपाने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात बिहार मोहिमेतील यशानंतर विनोद तावडेंचे महाराष्ट्रात कमबॅक झाले आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही पाच वर्षांत भाजपामध्ये मानाचे पान देण्यात आले आहे. भाजपकडून जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. पहिल्या टप्प्यात २४४ नगरपालिका आणि ४४ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडतील. विनोद तावडे यांची बिहार विधानसभा निवडणुकीतील जबाबदारी यशस्वी पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचे कमबॅक झाले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या काळात या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातील संघर्ष कसा रंग घेतो, तसेच भाजपाच्या प्रचारकांच्या मोहिमेचा परिणाम कसा होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.