सहा पालिकाक्षेत्रात २८ स्थिर निगरानी पथक

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
Wardha Six Municipal Areas जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये २ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या सीमा भागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २८ स्थिर निरीक्षण पथके गठीत करण्यात आली असून ११ भरारी पथकांचाही वॉच राहणार आहे. नगरपालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍या सर्व वाहनांची बारकाईने तपासणी स्थिर निगराणी पथकातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव आणि सिंदी रेल्वे या नगरपालिकांमध्ये ६ नगराध्यक्ष आणि १६६ नगरसेवकांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत तर २६ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे.
 

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो 
 
 
आचारसंहितेचे सहाही नगरपालिका क्षेत्रात काटेकोरपणे पालन करून घेतले जात आहे. प्रत्येक नगरपालिकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुतीही करण्यात आली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात पोलिस विभागाच्या सहाय्याने स्थिर निरीक्षण पथके तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. स्थिर निगरानी पथकातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून प्रत्येक वाहनाची ऑनकॅमेरा तपासणी केली जात आहे. वर्धा नगरपालिका हद्दीत ७ स्थिर निगरानी पथक तर २ भरारी पथक, हिंगणघाट ३ स्थिर निगरानी पथक तर २ भरारी, आर्वीत ५ स्थिर निगराणी तर २ भरारी पथक, देवळीत ४ स्थिर तर २ भरारी, पुलगाव ५ स्थिर तर १ भरारी आणि सिंदी रेल्वे येथे ४ स्थिर निगरानी पथक आणि २ भरारी पथकांचा समावेश आहे.