देशांतर्गत क्रिकेट खेळा नाहीतर...कोहली-रोहितला इशारा!

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली, 
Warning to Kohli-Rohit भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दोघांनी जबरदस्त कामगिरी केली. रोहितने शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला, तर कोहलीने अर्धशतक ठोकत संघाचा पाया भक्कम केला. चाहत्यांनी त्यांच्या खेळीवर स्तुतीसुमने उधळली, मात्र बीसीसीआय या दोघांच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

Virat Kohli and Rohit Sharma 
 
बीसीसीआयने कोहली आणि रोहितला स्पष्ट इशारा दिला आहे, जर राष्ट्रीय संघात स्थान टिकवायचे असेल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. कसोटी आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्त झाल्यानंतर आता हे दोघे फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या मॅच फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी विजय हजारे ट्रॉफीमध्ये या दोघांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
 
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला आधीच कळवले आहे की तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल. दुसरीकडे, विराट कोहलीने अजून आपली उपलब्धता निश्चित केलेली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जर या दोघांना भारतासाठी पुढे खेळायचे असेल, तर देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. त्यांनी आता इतर फॉरमॅट्समधून निवृत्ती घेतली असल्याने त्यांचा सामना-तंदुरुस्ती टिकवण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग गरजेचा आहे. रोहित शर्माने बीसीसीआयचा हा संदेश स्वीकारला असून तो २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी देखील उपलब्ध असू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या हंगामात रोहित आणि कोहली यांनी प्रत्येकी एक रणजी सामना खेळला होता. आता विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटकडे केव्हा वळतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.