पाकिस्तान पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला करणार!

ख्वाजा आसिफ यांचा तालिबानवर आरोप

    दिनांक :12-Nov-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Will attack Afghanistan पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्लामाबाद आणि वझिरिस्तानमधील अलीकडील दहशतवादी हल्ल्यांनंतर अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ल्यांचे संकेत दिले आहेत. त्यांनी या हल्ल्यांसाठी थेट अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला जबाबदार ठरवले असून, हल्लेखोरांना अफगाण भूमीवरूनच आश्रय दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
 
 
Will attack Afghanistan
 
गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानमध्ये दोन मोठ्या दहशतवादी घटनांनी खळबळ उडवली आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील कॅडेट कॉलेज वाना येथे झालेल्या हल्ल्यानंतर राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांमागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)चा हात असल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. या घटनांनंतर ख्वाजा आसिफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "या हल्ल्यांनंतर सीमापार कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना दिला जाणारा आश्रय पाकिस्तानसाठी थेट धोका बनला आहे." त्यांनी तालिबानच्या निषेधात्मक विधानांना फेटाळून लावत म्हटले की, "ही विधाने केवळ औपचारिक आहेत, कारण हल्लेखोर अजूनही अफगाणिस्तानच्या सुरक्षित ठिकाणांवरून हल्ले करत आहेत."
आसिफ यांनी भारतावरही टीका करत म्हटले की, पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये भारताचा हात असू शकतो."पाकिस्तान कोणत्याही संघर्षाला प्राधान्य देत नाही, पण आम्ही कोणत्याही प्रकारचा हल्ला सहन करणार नाही. जर हल्ले झाले, तर आम्ही त्याला ठोस प्रत्युत्तर देऊ,असे ते म्हणाले. इस्लामाबादमधील आत्मघाती हल्ल्यानंतर आसिफ यांनी सोशल मीडियावर लिहिले, आम्ही युद्धाच्या स्थितीत आहोत. ज्यांना वाटते की हे युद्ध फक्त सीमावर्ती भागात चालू आहे, त्यांनी इस्लामाबादमधील हल्ल्याकडे इशारा म्हणून पाहावे. या वक्तव्यांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालिबानने मात्र स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या भूमीवर कोणताही परकीय हल्ला सहन करणार नाहीत, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा धोका अधिकच गंभीर झाला आहे.