धक्कादायक...पश्चिम बंगालमध्ये ३४ लाख आधार कार्डधारक मृत

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
कोलकाता,
34 lakh Aadhaar card holders dead पश्चिम बंगालमध्ये तब्बल ३४ लाख आधार कार्डधारक मृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही माहिती निवडणूक आयोगाला सादर केली असून, या आकड्याने राज्य प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेत खळबळ उडवली आहे.
 
 
34 lakh Aadhaar card holders dead
 
UIDAI अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आकडेवारी जानेवारी २००९ पासून, म्हणजे आधार कार्ड योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंतची आहे. एवढेच नव्हे, तर राज्यात सुमारे १३ लाख लोक असेही होते ज्यांच्याकडे कधीच आधार कार्ड नव्हते, परंतु ते आता मृत असल्याचेही नोंदवले गेले आहे. ही माहिती बुधवारी UIDAI चे वरिष्ठ अधिकारी आणि पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीदरम्यान देण्यात आली. या बैठकीत मतदार याद्यांमधील अद्ययावत प्रक्रिया, आधार-मतदार कार्ड जोडणी आणि राज्यातील मृत व्यक्तींची नोंद यावर सविस्तर चर्चा झाली.
 
 
निवडणूक आयोगाच्या मते, आधार डेटाबेसमधील मृत व्यक्तींच्या नोंदींचे अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून मतदार याद्यांतील फसव्या नोंदी रोखता येतील. UIDAI च्या अहवालानुसार, ही तपासणी भविष्यातील निवडणुकांमध्ये पारदर्शकता वाढविण्यास मदत करणार आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात मृत आधारधारकांची नोंद आढळणे हे डेटा अद्ययावत प्रक्रियेत असलेल्या त्रुटीचे निदर्शक आहे. UIDAI आणि निवडणूक आयोग या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे राज्यभरात आधार पडताळणी मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मतदार याद्यांतील पुनरावृत्ती आणि मृत नोंदींचे उच्चाटन करता येईल.