नवी दिल्ली,
A massive explosion near the Red Fort in Delhi दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरून गेली आहे. या घटनेला सरकारने दहशतवादी कट ठरवले असून तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट केवळ एक अपघात नव्हता, तर देशभरातील चार प्रमुख शहरांमध्ये मालिका स्फोट घडवून आणण्याच्या कटाचा एक भाग होता. तपासात उघड झाले आहे की आठ दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून चार शहरांना लक्ष्य केले होते आणि मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची तयारी सुरू होती.
या प्रकरणात डॉक्टरांच्या गटाचा सहभागही समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉ. मुझम्मिल, डॉ. आदिल, उमर आणि शाहीन या चौघांनी मिळून सुमारे वीस लाख रुपयांची रोकड जमा केली होती. ही रक्कम दिल्ली स्फोटापूर्वी उमरकडे सुपूर्द करण्यात आली होती. परंतु याच पैशावरून उमर आणि डॉ. मुझम्मिल यांच्यात गंभीर वाद झाला आणि यानंतरच संशयास्पद हालचाली सुरू झाल्या. उमरने ‘सिग्नल’ या सुरक्षित मेसेजिंग अॅपवर दोन ते चार जणांचा गुप्त गट तयार केला होता.
तपासादरम्यान हेही समोर आले की या गटाने गुरुग्राम, नूह आणि आसपासच्या भागातून सुमारे तीन लाख रुपयांचे वीस क्विंटलपेक्षा जास्त NPK खत खरेदी केले होते. याच खतांचा वापर स्फोटक तयार करण्यासाठी करण्यात येत होता, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दहशतवाद्यांनी जुन्या आय-२० आणि इकोस्पोर्ट या गाड्या विकत घेऊन त्यात स्फोटकांचे लोडिंग केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अशाच आणखी दोन गाड्या मोठ्या स्फोटासाठी तयार करण्यात येत होत्या. सध्या या वाहनांच्या हालचाली आणि त्यांचा वापर नेमका कुठे होणार होता, याचा तपास सुरु आहे.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. प्राथमिक चौकशीत तपास यंत्रणांना हे जैश-ए-मोहम्मदच्या नव्या मॉड्यूलचे काम असल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली आहे. सध्या हे पथक दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंतच्या सर्व संशयित ठिकाणांची तपासणी करत असून, देशातील सुरक्षिततेसाठी या कटामागील संपूर्ण जाळे उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.