तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad-municipal-council-election : 2 डिसेंबर रोजी होणारी पुसद नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्रपणे लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे तसेच पुसद जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख अॅड. नीलय नाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. परंतु अध्यक्षपदावरून तडजोड होऊ शकली नाही. दोन्ही पक्ष अध्यक्षपदासाठी ठाम होते. त्यामुळे वाटाघाटीचे घोडे पुढे दौडले नाही.

या ठिकाणी उल्लेखनीय बाब अशी की, मागील पुसद विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी इंद्रनील नाईकांचे इमानेइतबारे काम केले. त्यामुळे त्यांना विक्रमी 93 हजारांचे मताधिक्य मिळाले. हे मताधिक्य भाजपामुळेच मिळाले असा दावा करण्यात आला. म्हणून अध्यक्षपद भाजपाला मिळाले पाहिजे परंतु त्यांची मागणी इंद्रनील नाईक यांनी मान्य केली नाही. विद्यमान आमदार व मंत्रीपद त्यांच्याकडे असल्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचा दावा आहे अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी वाटाघाटीतून काही निष्पन्न न झाल्याने दोन्ही पक्ष आगामी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवणार हे स्पष्ट झाले.
दोन्ही पक्षांकडे अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी पुसद जिल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या कोर कमिटी मिटिंगसाठी पुसद जिल्हा निवडणूक प्रभारी माजी मंत्री मदन येरावार, पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, अॅड. नीलय नाईक आणि डॉ. आरती फुफाटे उपस्थित होते. याआधीच महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसकडे सोपविण्यात आला आहे आणि डॉ. महंमद नदीम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.