कोल्हापूर किरणोत्सवात ढगांचा अडथळा!

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
कोल्हापूर,
Clouds obstruct Kolhapur Kironotsav करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याचा आज चौथा दिवस ढगांच्या अडथळ्यामुळे अपूर्ण राहिला. सायंकाळी आकाशात गडद ढग दाटून आल्याने आणि हवेत आर्द्रता वाढल्याने सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाली. परिणामी, गाभाऱ्यात पोहोचणाऱ्या किरणांचा सुवर्णमयी प्रवास आज मंदावला. सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी मंदिराच्या प्रवेशद्वारातून पहिली किरणे आत आली. मंद सोनसळी झळाळीने मंदिर उजळून निघाले. पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी ही किरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली, तर पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त झाली. त्यानंतर मंदिर परिसरात आरतीचा मंगल नाद घुमला आणि भक्तांनी “अंबाबाई की जय”चा जयघोष केला.
 

Kolhapur Kironotsav 
 
 
मात्र ढगाळ वातावरणामुळे यंदाचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने साध्य झाला नाही. यापूर्वी २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी मावळतीच्या किरणांनी देवीच्या मुखकमलावर सोनसळी प्रकाशाचा अलंकार चढविला होता. यंदाही तशीच अपेक्षा होती, पण हवामानाच्या अडथळ्यामुळे ते दृश्य पाहायला मिळाले नाही. आजच्या किरणोत्सवात झालेल्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिरात भेट दिली. त्यांच्यासोबत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते. दरवर्षी दक्षिणायनातील हा किरणोत्सव कोल्हापूरकरांसाठी श्रद्धा, खगोलशास्त्र आणि परंपरेचा संगम ठरतो. शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही अनोखी परंपरा सूर्याच्या किरणांचा अचूक कोन, काळ व देवीच्या मूर्तीवरील किरणांचा प्रवास याचे अप्रतिम दर्शन घडविते. यंदा ढगांनी काहीसा अडथळा आणला असला, तरी भक्तांच्या मनातील श्रद्धेचा प्रकाश मात्र अविरत तेजाळत राहिला.