खासदार महोत्सवाच्या मंचावर अवतरला भारत

-१००० कलाकारांनी प्रस्तुत केली लोकसंस्कृतीची झलक -खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी उधळले ‘मिट्टी के रंग’

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नागपूर,
mp-cultural-festival-2025 : हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ च्या सातव्या दिवशी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात संस्‍कार भारती, नागपूर यांच्या कलाकारांनी भारताच्या विविध राज्यांच्या परंपरा, लोककला आणि राष्ट्रीय सांस्कृतिक वैभव उजागर करणारा ‘मिट्टी के रंग : भारताची लोकसंस्कृती की संगीत नृत्यमय गाथा’ हा देखणा कार्यक्रम सादर केला. तब्बल १००० गायक, वादक आणि नृत्यकलावंतांनी सहभाग घेत दणदणीत कलाविष्कार सादर केला. यावेळी पटांगण प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.
 
 

ngp 
 
कार्यक्रमाची सुरुवात संस्कार भारतीच्या ध्येयगीताने झाली. त्यानंतर प्रेक्षकांसमोर एकापाठोपाठ एक विविध प्रांतांतील लोककलांचे रंग उलगडत गेले. उत्तराखंड प्रांतातील ‘नमो नमो जी शंकरा’ व ‘तुम्हे दिल मी बसाया’ ही गीतरचना वातावरणात भक्तिभाव निर्माण करणारी ठरली. आसामच्या भूमीतल्या बिहू नृत्याची उत्साहवर्धक प्रस्तुती, राजस्थानच्या परंपरेतील ‘म्हारो हेलो सांभाळो’ या सुरांनी सजलेला घुमर, ओडिशाचा संबलपुरी दारा लोग, बंगालच्या ‘फागुनेर कोमालो सुंदरी’ची मृदू लय, कर्नाटकचा कदुलू, ब्रजभूमीतील ‘होरी खेले रघुवीरा’चा फागोत्सवातील आनंद, पंजाबच्या गिद्ध्याची झंकार आणि महाराष्ट्राचा ढोलताशांचा गजर—अशा लोककलेच्या विविध रूपांनी पटांगण दुमदुमले. ‘वेसवीची पारू’, ‘लटपट’, ‘गडावर गड संबळ’ यांसारख्या महाराष्ट्रातील नृत्य-सादरीकरणांनीही प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचा समारोप भारताच्या एकतेचे प्रतीक ठरलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीताने झाला.
 
या भव्य सादरीकरणाचे संयोजन गजानन रानडे, अमर कुलकर्णी आणि आनंद मास्टे यांनी केले. सहसंयोजक म्हणून अवंती काटे, श्रीकांत धबडगावकर आणि कुणाल आनंदम यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. संगीत मोरेश्वर दशसहस्त्र आणि अथर्व शेष यांचे होते. संहिता लेखन आशुतोष अडोणी यांनी केले, तर निवेदन श्रद्धा भारद्वाज आणि सनी प्रसाद यांनी समर्थपणे सांभाळले. सुनील हमदापूरे यांच्या नेपथ्यामुळे कार्यक्रमाला अनोखी दृश्यकळा लाभली. ध्वनी व प्रकाशयोजना संदिप बारस्कर यांनी प्रभावीपणे हाताळली. निर्मिती सहाय्यात डॉ. मृणालिनी दस्तुरे, मुकुल मुळे, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, प्रदीप मारोटकर, शंतनु हरिदास, आसावरी गोसावी, अक्षय वाघ, संजय खनगई आणि स्मिता खनगई यांच्या कार्याचा मोलाचा वाटा राहिला.
 
आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचनताई गडकरी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, हल्दीरामचे शिवकिशन अग्रवाल, निकोचे संचालक रमेश जयस्वाल, उद्योगपती पद्मेश गुप्ता, तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, श्रीमत राजे मुधोजी भोसले, यशपाल आर्य, संस्कार भारतीचे आशुतोष अडोणी, चंद्रकांत घरोटे या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. तत्पूर्वी, गजवक्र ढोलताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मिती केली.
या कार्यक्रमाचे बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.
मेहंदी परंपरेला युनोची मान्यता - नितीन गडकरी
 
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी शारदोत्सवात एक लाखाहून अधिक महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. यातून 6 हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. आपल्या या परंपरेला युनोची मान्यता मिळाली असल्याची शुभवार्ता नितीन गडकरी यांनी दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा सांस्कृतिक मूल्य जपणारा महोत्सव असून संस्कार भारतातर्फे सादर झालेला ‘मिट्टी के रंग ' हा कार्यक्रम एकता व एकात्मतेचा संदेश देणारा आहे, असे ते म्हणाले.
‘जागर भक्तीचा’ उपक्रमांतर्गत महापरित्राण पाठ 16 नोव्हेंबरला
 
 
बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहण्‍याचे आवाहन
 
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘जागर भक्तीचा’ या अध्यात्मिक मालिकेअंतर्गत रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता ‘महापरित्राण पाठ’ चे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
समाजाचे रक्षण आणि कल्याण यासाठी तथागत बुद्धांनी दिलेला करुणा, शांती आणि समता यांचा संदेश या महापरित्राण पाठाद्वारे देण्‍याचा मुख्‍य उद्देश आहे. या कार्यक्रमाला 100 हून अधिक बौद्ध भिक्षू उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी व्हावे आणि समाजातील सर्व बौद्ध बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘महापरित्राण पाठ’ कार्यक्रमाचे संयोजक संदीप गवई यांच्यासह माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संदीप गवई, संदीप जाधव, महेंद्र प्रधान, सुभाष पारधी, महेंद्र धनविजय, सतीस सिरसवान, नागेश सहारे, शंकर मेश्राम, उषा पायलट, कुलदास पाटील, रमेश वानखेडे, शरद पारधी, अविनाश धमगाये, इंद्रजीत वासनिक, संदीप पाटील, संदीप बेले, मोहिणी रामटेके, मोहिनी रामटेके, हेमलता, सचिन कांबळे, योगेश बंग, वच्छला मेश्राम, वंदना भगत, शैलेश चावरे, प्रीती बहादरे, विभा ठवरे, पिंकी पाटील, देवराज वासनिक, पुष्पलता आंबुलकर, रुपेश गावडे, निशा पाटील यांनी केली आहे.