नागपूर,
property-family-dispute : संपत्ती आपल्या नावावर करण्याच्या हव्यासाने आंधळ्या झालेल्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांवरच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रमणा मारुती परिसरात घडली. या हल्ल्यात वृद्ध वडिलांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली असून आईलाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. प्रमोद पांडे (५३) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो दारूच्या आहारी गेलेला आहे. त्याचे वडील माधव पांडे (७८) हे निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. माधव यांनी आयुष्यभर परिश्रम करून संपत्ती उभी केली. मात्र त्याच संपत्तीवर मुलगा प्रमोदचा डोळा होता. तो वारंवार घर आणि मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यासाठी वडिलांवर दबाव टाकत होता.

बुधवारी दारूच्या नशेत असलेल्या प्रमोदने पुन्हा वाद सुरू केला. संतापाच्या भरात त्याने वडिल माधव यांच्यावर चाकूने वार केला. चाकू त्यांच्या गालावर बसला आणि ते रक्तबंबाळ झाले. हे पाहून आई शोभा पांडे (७५) मध्ये पडल्या आणि मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रमोदने त्यांनाही जोराचा धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. शेजाऱ्यांनी तत्काळ नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वृद्ध दांपत्याला रुग्णालयात दाखल केले आणि आरोपी प्रमोद पांडे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माधव पांडे यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मुलींचे विवाह झाले असून दुसऱ्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्या घटनेनंतर प्रमोद मानसिक तणावाखाली होता आणि दारूच्या नशेत वारंवार आई-वडिलांशी वाद घालत होता.