१३ वाहनांची चोरी उघड, एक अटकेत ; दोन फरार

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
vehicle-theft : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसवित नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या वाहन चोरी पथकाने तिघांच्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १३ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.
 
 
 
ngp
 
 
 
अटकेत घेतलेल्याचे नाव रिषभ शाम असोपा (३५, शांती पॅलेस, लकडगंज) असे असून, फरार आरोपींमध्ये रितिक शामसुंदर असोपा आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. ही कारवाई लकडगंज पोलिस ठाण्याच्या गुन्हा क्रमांकावरून सुरू झाली होती. रमेश अर्जुन डोनारकर (५६, शिवनकरनगर) यांनी ७ ऑक्टोबर रोजी आपली दुचाकी (एमएच ४९ एएन ५५८७) धनसंन्स लॉनजवळ पार्क केली होती, ती तेव्हाच चोरीला गेली होती. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पथक बुधवारी वाठोडा-दिघोरी परिसरात हॉटेलांची तपासणी करत असताना रिषभ असोपा हा संशयित दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याने रितिक असोपा आणि विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत मिळून शहरातील विविध भागांतून एकूण १३ दुचाकी चोरी केल्याचे उघड केले. पोलिसांनी सर्व चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.