नवी दिल्ली,
Omar in the capital before the explosion लाल किल्ला स्फोट प्रकरणातील मुख्य संशयित दहशतवादी मोहम्मद उमर स्फोटाच्या काही तासांपूर्वी जवळजवळ अर्ध्या दिल्लीभर फिरल्याचे धक्कादायक तपशील पोलिस तपासात समोर आले आहेत. दिल्ली पोलिसांकडे उमरच्या हालचालींची सुमारे ५० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज मिळाली असून, त्यातील काही व्हिडिओंमध्ये तो मास्कशिवाय स्पष्ट दिसत आहे. पोलिसांच्या मते, उमर १० नोव्हेंबरच्या सकाळी फरिदाबादहून दिल्लीकडे रवाना झाला आणि दुपारी तीनच्या आत त्याने दिल्लीतील आग्नेय, पूर्व, मध्य, उत्तर आणि वायव्य जिल्ह्यांचा दौरा केला. सुरुवातीला तो बदरपूर परिसरात दिसला, त्यानंतर आग्नेय दिल्लीतील अनेक रस्त्यांवरून तो गाडी चालवत होता. त्याची हालचाल आसिफ अली रोड, कॅनॉट प्लेस आणि रिंग रोडवरही नोंदली गेली. यानंतर उमर अशोक विहार येथे एका खाद्यपदार्थ दुकानात थांबला आणि नंतर पुन्हा मध्य दिल्लीच्या दिशेने परतला.

तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, लाल किल्ल्यापूर्वी उमरने तुर्कमान गेट परिसरातील एका मशिदीला भेट दिली होती. त्या मशिदीच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची प्रतिमा आढळली असून, दिल्ली पोलिसांनी या फुटेजची पुष्टी केली आहे. काही तासांनंतरच तो लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये पोहोचला, जिथे स्फोटाची घटना घडली. घटनास्थळी सापडलेल्या अवशेषांच्या डीएनए विश्लेषणातून उमरच त्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा चालक असल्याची खात्री झाली आहे. या तपासामुळे लाल किल्ला स्फोटाशी संबंधित अनेक धागेदोरे जोडले गेले असून, उमरची संपूर्ण हालचाल नकाशावर मॅप करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांच्या मते, मोहम्मद उमर हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कोइल गावचा रहिवासी होता आणि अलीकडेच उध्वस्त करण्यात आलेल्या “व्हाईट कॉलर नेटवर्क”चा एक प्रमुख सदस्य होता. हे नेटवर्क बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच तीन डॉक्टरांचा समावेश असलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर केवळ काही तासांतच लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण तपास अधिक गडद आणि गुंतागुंतीचा बनला आहे. दिल्ली पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणा सध्या उमरच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा मागोवा घेत आहेत.