विकृत मनोवृत्ती, उदासीन प्रशासन

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
 
 
वेध
molestation of students ‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असा संस्कृत श्लोक आहे. जिथे स्त्रीचे पूजन होते तिथे देवता वास करतात असा त्याचा अर्थ. आमच्या संस्कृतीत मातृपूजनाचे मोठेे महत्त्व आहे. आश्विन नवरात्र तर मातृपूजनाचा मोठा उत्सवच. एकीकडे हजारो वर्षांपासूनची ही समृद्ध परंपरा असतानाच दुसरीकडे महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, अत्याचार या मन सुन्न करणाऱ्या घटना वारंवार समोर येतात. या घटना कायद्याने गुन्हा या श्रेणीत येत असल्या तरी खरं म्हणजे हा मानवी सभ्यतेवर असलेला काळाकुट्ट डागच.
 
 

विनयभंग  
 
 
माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आणि जागतिकीकरणाच्या या युगात आपण भौतिक प्रगती तर झपाट्याने करीत आहोत पण त्याच गतीने दिवसेंदिवस कमी होत असलेली नैतिकता ही समाजासमोर असलेली मोठी समस्या आहे. त्यातही ज्याने नैतिकतेचे, चांगुलपणाचे, चारित्र्याचे शिक्षण देणे अपेक्षित आहे असा शिक्षकच जेव्हा विद्यार्थिनींचा विनयभंग करतो तेव्हा मात्र स्वाभाविक आत्यंतिक चीड निर्माण होते. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या एका आडवळणाच्या गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने पाच चिमुकल्या मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आणि पुन्हा याबाबतची चर्चा सुरू झाली. देशात महिला, मुलींवर अत्याचाèयाच्या घटना नेहमीच घडतात. या संदर्भातील नोंद झालेली आकडेवारी भयावह आहे. 2024 च्या आकडेवारीनुसार दररोज 90 पेक्षा अधिक बलात्काराच्या घटना नोंदविल्या जातात. त्यातही धक्कादायक म्हणजे यात मुलींवर अत्याचाराची टक्केवारी 30 एवढी आहे. ही केवळ आकडेवारी म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर ही संख्या समाजातील विकृत मानसिकता असणाऱ्यांची आहे. केवळ अकोला जिल्ह्याचा आणि त्यातही शाळांमधील प्रकरणाचा विचार केला तर गत दोन वर्षांत पातूर तालुक्यात उघडकीस आलेली ही चौथी घटना आहे. एप्रिल 2023 मध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील धामणदरी येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षकांनी चार मुलींवर अत्याचार केला होता. तर दुसरी घटना जुलै 2024 रोजी गुडधी जिल्हा परिषद शाळेत घडली होती. पोषण आहार मदतनिसाने येथे मुलीचा विनयभंग केला होता. तिसऱ्यां घटनेत बाळापूर तालुक्यातील काझीखेड जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. या चारही घटनांमधील आरोपींना अटक करून गुन्हे देखील दाखल करण्यात आले. पण केवळ गुन्हे दाखल करून या समस्येचे निराकरण शक्य आहे का? हा खरा प्रश्न आहे. महिला, मुलींचे लैंगिक शोषण, विनयभंग हे मानवी मूल्यांच्या अध:पतनासह एक विकृती आहे. ही विकृती थांबविण्यासाठी केवळ कायद्याच नव्हे तर नैतिक मूल्य, संस्कारांची रुजवण आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजातील विविध व्यक्ती, संघटनांना सकारात्मक पुढाकार घ्यावा लागेल. शासन देखील याबाबत गंभीर आहेच. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या घटनांमधून धडा घेत शासनाने विविध उपाययोजना त्या-त्या स्तरावर केल्या आहेत. यात शालेयस्तरावर सखी-सावित्री समितीचे गठन करून या समितीद्वारा संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून जाणीव जागरणाचे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्त्री, मुली यांना आधार वाटावा याकरिता पोलिस प्रशासनाचे दामिनी पथक देखील कार्यरत आहे. पण मुळात सर्वच ठिकाणी या समिती, पथकाची क्रियाशीलता किती असा प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी सखी-सावित्री समिती केवळ कागदावर तर दामिनी पथक शहर, तालुकास्तरावर असलेल्या शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचून फोटो काढण्यात धन्यता मानते. काही ठिकाणी चिडीमारांचा बंदोबस्त होतो हे मान्य असले तरी स्वत:हून आवश्यक असलेला पुढाकार या समिती, पथकाद्वारे घेतल्या जात असल्याचे दिसून येत नाही.molestation of students प्रशासकीय कोडगेपणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील शाळांमधील घटनांनंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील 912 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी तब्बल 4.10 कोटींचा निधी जानेवारी महिन्यात मंजूर केला. पण तब्बल 9 महिन्यांनंतरही शाळांमध्ये सीसीटीव्ही लागले नाहीत. जेमतेम दोन दिवसांपूर्वी त्याची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील घटनांमुळे विकृतांबद्दल चीड निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण याबाबत शासनाने योजिलेल्या उपाय योजनांची प्रशासनाने केवळ खानापूर्ती करावी हेही संतापजनक नव्हे का?
 
नीलेश जोशी
9422862484