जम्मू,
Srinagar to Pulwama Tharrar दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण देशभरात सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. या स्फोटाचा धागा जम्मू-काश्मीरशी जोडला गेल्याचं समोर आलं असून, तिथे मोठ्या प्रमाणावर संशयितांचा शोध सुरू आहे. स्फोटानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी तब्बल ५०० ठिकाणी धाडी टाकल्या असून ६०० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईचं मुख्य लक्ष्य जमात-ए-इस्लामी (जेआय) या बंदी घातलेल्या संघटनेवर केंद्रित आहे. सुरक्षा यंत्रणांना अशी माहिती मिळाली होती की ही संघटना पुन्हा सक्रिय होत असून, दहशतवादी नेटवर्क उभं करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर तात्काळ मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्याचं अभियान राबवण्यात आलं. श्रीनगर, पुलवामा, कुलगाम, शोपियान आणि बारामुल्ला अशा अनेक संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
संग्रहित फोटो
दरम्यान, "डॉक्टर मॉड्यूल" नावाच्या दहशतवादी गटावरही कारवाई झाली असून, तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम येथे रात्रीच्या छाप्यांदरम्यान हे संशयित पकडले गेले. लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या तपासात उघड झालं आहे की काही आरोपी गेल्या वर्षी तुर्कीला प्रवास करून आले होते. स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत "व्हाईट कॉलर टेररिस्ट" या नेटवर्कशी संबंधित २०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला अटक झालेल्या दोन दहशतवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीतूनच हे मॉड्यूल उघडकीस आलं. या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये २०० आणि श्रीनगरमध्ये १५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरातही पोलिसांनी सुमारे ३० ठिकाणी तपास मोहिम राबवली. छाप्यादरम्यान पोलिसांना अतिरेकी साहित्य, बंदी घातलेल्या संघटनांचे पोस्टर्स, गॅझेट्स आणि अनेक डिजिटल पुरावे मिळाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, जमात-ए-इस्लामी पुन्हा एकदा काश्मीरमध्ये अतिरेकी विचारधारा वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, आणि त्यामुळेच ही कारवाई आवश्यक होती. भूतकाळातही जमात-ए-इस्लामी ही संघटना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षादलांसाठी डोकेदुखी ठरली होती. आता पुन्हा तिच्या वाढत्या हालचालींमुळे एजन्सी सतर्क झाल्या आहेत आणि खोऱ्यातील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.