कानपूर,
Terrorist network from Kanpur दिल्ली स्फोट आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. तपास यंत्रणांनी कानपूरमधील कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी डॉक्टर आरिफ याला ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथील रहिवासी असलेले डॉ. आरिफ हे डॉ. शाहीन शाहिद यांचे जवळचे सहकारी असल्याचे उघड झाले आहे. स्फोटाच्या दिवशी ते डॉ. शाहीन आणि डॉ. परवेझ यांच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संग्रहित फोटो
एटीएसने कानपूरच्या अशोक नगर भागातील त्यांच्या भाड्याच्या घरावर छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले. आरिफ हे NEET SS-2024 बॅचचे विद्यार्थी असून, अटकेच्या आधी मंगळवारी त्यांनी दुपारच्या शिफ्टमध्ये काम केले होते. तपास यंत्रणांना डॉ. शाहीन यांच्या मोबाईलमध्ये दोघांमधील एसएमएस संवादाची नोंद सापडल्याने शंका अधिक गडद झाली आहे.
डॉ. शाहीन यांनी 2006 ते 2013 या काळात कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये काम केले होते. योगायोगाने कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूट आणि मेडिकल कॉलेज हे एकाच कॅम्पसमध्ये असल्याने दोघांमध्ये ओळख वाढली. तपासात असेही समोर आले आहे की, हे दोघे बराच काळ एकाच वसतिगृहात राहात होते आणि त्यानंतर त्यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला. पोलिसांना संशय आहे की, या काळातच त्यांनी देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. आरिफच्या अटकेनंतर डॉ. शाहीनच्या नेटवर्कशी जोडलेल्या आणखी काही संशयित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांचा फॉरेन्सिक तपास सुरू असून, संपर्क साखळीचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये जम्मू-काश्मीरमधील सात विद्यार्थी डॉक्टरेट पदवीसाठी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी संस्थेभोवती अतिरिक्त बंदोबस्त वाढवला असून, सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.