वॉशिंग्टन,
Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासाठी मोठा दिलासा देणारी घडामोड समोर आली आहे. तब्बल 43 दिवसांच्या विक्रमी सरकारी शटडाऊननंतर अमेरिकन काँग्रेसने अखेर फेडरल फंडिंग बिल मंजूर केले असून, या निर्णयामुळे केंद्र सरकारचे बंद पडलेले कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. आता हे बिल ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसाठी ओव्हल ऑफिसमध्ये पाठविण्यात आले आहे. व्हाईट हाऊसनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करतील.
सीएनएनच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात दीर्घ शटडाऊन ठरला आहे. रिपब्लिकन पक्षातील काही सदस्यांनी ओबामाकेअरशी संबंधित कार्यक्रमाला विरोध दर्शविल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय गतिरोधामुळे सरकार जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त काळ ठप्प राहिले. अखेरीस अमेरिकन सेनेटने फंडिंग बिल मंजूर केले आणि त्यानंतर प्रतिनिधीगृहानेही या विधेयकाला हिरवा कंदील दाखविला. या मतदानात बहुतेक रिपब्लिकन सदस्यांनी आणि काही डेमोक्रॅट सदस्यांनी बिलाच्या बाजूने मतदान केले.
निधी मिळणार!
बिल मंजूर झाल्याने आता केंद्र सरकारचे विविध विभाग पुन्हा कार्यरत होणार आहेत. शासकीय कर्मचारी, ठप्प पडलेली प्रकल्पे आणि सार्वजनिक सेवांना आता निधी मिळणार आहे. नवीन फंडिंग कालमर्यादा 30 जानेवारीपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सीएनएनच्या माहितीनुसार, SNAP, WIC आणि व्हेटरन्स सेवा यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना 2026 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत निधी उपलब्ध राहील.या मतदानात डेमोक्रॅट पक्षातील सहा खासदारांनी पक्षाची भूमिका मोडून फंडिंग बिलाला पाठिंबा दिला. त्यामध्ये जॅरेड गोल्डन, मेरी ग्लुसेनकॅम्प पेरेझ, अॅडम ग्रे, हेन्री कुएलर, टॉम सूओझी आणि डॉन डेविस यांचा समावेश आहे. उलटपक्षी, रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी आणि ग्रेग स्ट्यूबे यांनी या बिलाला विरोध केला.या निर्णयामुळे अमेरिकन प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असून, दीर्घकाळ थांबलेले सरकारी कामकाज आणि विविध सार्वजनिक योजना पुन्हा गतीने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील दबाव काही प्रमाणात कमी होणार असून, देशातील कर्मचारी आणि नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची सकारात्मक घडामोड ठरणार आहे.