लखनौ,
White-collar terrorism उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात उघडकीस आलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्कच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर भावंड – डॉ. शाहीन शाहिद आणि डॉ. परवेझ – हे कसे कट्टरपंथी बनले, याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला दोघेही जिहादचे चित्रण करणारे व्हिडिओ ऑनलाइन पाहत होते. हे व्हिडिओ पाहत असताना त्यांच्या विचारसरणीत हळूहळू बदल झाला आणि ते अतिरेकी विचारांच्या प्रभावाखाली आले. जसजसे त्यांचे या व्हिडिओंवरचे आकर्षण वाढत गेले, तसतसे त्यांनी स्वतःच कट्टरपंथी विचार स्वीकारले आणि शेवटी डॉ. मुझम्मिल नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आले. यानंतर दोघेही एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग बनले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की डॉ. परवेझ कोणत्याही कॉल किंवा मेसेजनंतर लगेच तो डेटा डिलीट करत असे. त्याच्या घरातून १० मोबाईल फोन, एक टॅबलेट, एक लॅपटॉप आणि एक हार्ड डिस्क जप्त करण्यात आली आहे. सर्व डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, डिलीट केलेला डेटा पुन्हा प्राप्त करण्याचे काम सुरू आहे.जप्त केलेल्या मोबाईल फोनमध्ये कीपॅड तसेच स्मार्टफोन दोन्ही प्रकारचे उपकरण आहेत. यातील सिम कार्ड विविध नावांनी आणि पत्त्यांवर नोंदणीकृत असल्याचे पोलिसांना आढळले आहे. आता या मोबाईल नंबरच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचे विश्लेषण करून संपर्क साखळी आणि संभाव्य दहशतवादी जोड शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.