तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ghatanji-bus-stand : जिल्ह्यात सर्वत्र अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले असून यावर आरटीओसह पोलिस विभागाचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. या अवैध वाहतूकदारांनी घाटंजी बसस्थानकासमोर ठाण मांडून प्रवासी भरणे सुरू केल्यामुळे शासनाच्या आखून दिलेल्या 200 मिटर मर्यादेला तिलांजली दिल्याचे निदर्शनास येत आहे.
घाटंजीकरांसाठी यवतमाळ म्हणजे जवळची मोठी बाजारपेठ तसेच जिल्हा स्थान असल्याने या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यातच जिल्हास्थानी तसेच घाटंजी येथे कार्यरत अनेक कर्मचारी शेकडोच्या संख्येने रोज प्रवास करीत असतात. मात्र यात महामंडळाचा फायदा व्हायच्या ऐवजी बसस्थानकासमोर भरण्यात येणाèया अवैध प्रवसी वाहतुकीमुळे नुकसान होत आहे. तसेच बसस्थानकासमोर वाहन उभे करण्यात येत असल्यामुळे एसटी बसला बसस्थानकात येण्यास व बाहेर जाण्यास अनेकवेळा अडचण निर्माण होत आहे.
अवैध प्रवासी वाहनधारकांना बसस्थापकापासून 200 मिटरचे बंधन असताना या अवैध वाहतुकदारांकडून घाटंजी बसस्थानकासमोरच वाहने उभी करून प्रवासी भरण्यात येतात. त्यामुळे त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. विशेष म्हणजे अवैध प्रवासी वाहतुकदारांकडून मर्यादेच्या बाहेर प्रवासी बसवण्यात येत असून यात नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात बसस्थानक प्रमुखांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यासोबतच बसस्थानकावरील चिडीमारी व इतर गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कायमस्वरूपी शिपायाची मागणी करण्यात आली आहे. मात्र या निवेदनावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
घाटंजी बसस्थानकप्रमुखांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनावर नक्कीच कार्यवाही करण्यात येईल. तसेच बसस्थानकावरील चिडीमारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस शिपायाची व्यवस्था करण्यात येईल.
केशव ठाकरे
ठाणेदार, घाटंजी पोलिस ठाणे.