बिहारमध्ये एआयएमआयएमची एंट्री ठरली एनडीएला फायद्याची!

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
पाटणा,
AIMIM's entry into Bihar बिहार विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रदेशात मोठे राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. एनडीएला मिळत असलेल्या मजबूत आघाडीच्या मागे असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुस्लिमबहुल सीमांचल पट्ट्यात एनडीए पूर्वी कमकुवत मानले जात असताना, ओवेसींच्या प्रवेशामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. किशनगंज, पूर्णिया, अररिया आणि कटिहार या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ३० ते ६५ टक्क्यांपर्यंत आहे. हेच मतदार पूर्वी राजद–काँग्रेस महाआघाडीच्या बाजूने एकतर्फी मतदान करत होते.
 
 
 
AIMIM
 
मात्र, ओवेसी यांनी या वेळेस मोठ्या प्रमाणावर प्रचार करत मुस्लिम मतदारांना महाआघाडीवर नाराजी व्यक्त करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी महाआघाडीवर ‘मुस्लिम समाजाचा फक्त वापर करणारे’ असे आरोप करत स्वतःला खरा पर्याय म्हणून मांडले. यामुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली आणि त्याचा थेट परिणाम एनडीएच्या उमेदवारांना लाभदायी ठरला. सीमांचलमध्ये एकूण २४ जागा असून, यातील जवळपास २० जागांवर एनडीए आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. महाआघाडी या भागात १२ जागांवर लढत आहे, तर आरजेडीचे ९ आणि व्हीआयपीचे २ उमेदवार आहेत. दुसरीकडे, एनडीएतर्फे भाजप ११, जेडीयू १० आणि एलजेपी ३ जागांवर रिंगणात आहे. एआयएमआयएम १५ जागांवर निवडणूक लढवत असून, मागील निवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या यशाची छाप यंदाही उमेदवारांवर दिसत आहे.
 
 
ओवेसींच्या प्रचारामुळे मुस्लिम मत दोन गटात विभागल्याने महाआघाडीचे नुकसान आणि एनडीएला थेट फायदा होताना दिसत आहे. सीमांचलमधील या समीकरणांमुळे संपूर्ण बिहार निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव पडू शकतो. ओवेसींचा करिष्मा आणि आंदोलनात्मक प्रचार महाआघाडीची मते खालावत असताना, एनडीएला अनपेक्षितरीत्या मजबूत स्थितीत आणत आहे.