वाशीम,
Ashok Mankar as the president येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या वत्सगुल्म मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध विनोदी लेखक अशोक मानकर यांची निवड १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. संमेलन समिती अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी एका सभेत ही घोषणा केली. भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहकार्याने एस.एम.सी. शिक्षण संकुल परिसरात २० आणि २१ डिसेंबर रोजी हे संमेलन होत आहे. कथाकथन, चर्चासत्र, तीन परिसंवाद, कविसंमेलन, प्रकट मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च मेजवानी वाशीमकर रसिकांना लाभणार आहे.

दरम्यान, या संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार, याकडे जिल्ह्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून होते. बैठकीत ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी विनोदी कथालेखक अशोक मानकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. कवी मोहन शिरसाट यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांनी लेखक अशोक मानकर यांच्या नावाची घोषणा केली. या सभेला संमेलन समिती सचिव पुरूषोत्तम शर्मा, कोषाध्यक्ष डॉ. संजय चौधरी, समन्वयक प्रा. गजानन वाघ, ग्रंथ संपादन समिती प्रमुख डॉ. विजय जाधव, डॉ. विजय काळे, काव्याग्रहचे व्यवस्थापकीय संचालक विठ्ठल जोशी, प्राचार्य डॉ. विजय पांडे, उपप्राचार्य सुनील उज्जैनकर, कार्यालय व्यवस्थापक पवन खंडेलवाल आदी उपस्थित होते.