वेध
: रेवती जोशी-अंधारे
Bhajan Clubbing-trend-genz आपण भारतीय पिढ्यान् पिढ्या संगीत आणि कलाप्रेमी आहोत. जन्मापासून मरणापर्यंतचा प्रत्येक सोहळा गीत-संगीताने बद्ध आहे. टाळ-मृदुंगाच्या लयबद्ध ठेक्यावर ‘राम कृष्ण हरी’ म्हणत रंगणारे भजन आता, गिटार-ड्रमच्या फास्ट बिट्सवर वाजवले आणि गायले जात आहे. जेन झीने ‘भजन क्लबिंग’ असं ट्रेंडी नाव या भजन प्रकाराला दिले असून, ही एक प्रकारची सांस्कृतिक पार्टी आहे. भजन क्लबिंग म्हणजे ‘भजन संध्या’ नाहीच पण, ‘नाईट क्लब’ही नाही. या दोन टोकाच्या सामूहीक एकत्रीकरण म्हणजे फ्यूजन नव्या पिढीने तयार केले आणि सध्या त्याचा छान ट्रेंड आला आहे.
Bhajan Clubbing-trend-genz अगदी अलिकडेपर्यंत गाजलेल्या बॉलीवूड गाण्यांच्या चालींवर देवीचा जगराता, विविध आरत्या, मंत्र-स्तोत्रे आणि भक्तीगीते गाण्याचा ट्रेंड होता. आता या भजन-श्लोकांचाही रिमेक झाला आहे आणि तो सकारात्मक आहे. हाय एनर्जी आणि ठेका धरायला बाध्य करणारे इलेक्ट्रॉनिक बिट्स म्हणजे ‘भजन क्लबिंग’ची ‘जान’ आहे. कल्पना करा, वीकेण्डच्या पार्टीजमधला मंद प्रकाश, आरशासारख्या चमकदार भिंती आणि सोबत डिजेवर ‘हरे रामा, हरे कृष्णा’ची धून! नामसंकीर्तनात भक्त नाचतात हे आपण जाणतोच पण, क्लबमधल्या या वातावरणात आपली जेन झी फेर धरून, अगदी वेडावून नाचत आहेत. ही कमाल अध्यात्मिक शब्द पण, लेटेस्ट म्युझिक वाद्यांमुळे होते आहे.
Bhajan Clubbing-trend-genz कोणतेही मादक पदार्थ, मद्य न घेता चढलेली ही झिंग प्रभूनामाची आहे, हे अनुभवातूनच समजते. आपल्या संस्कृतीसोबतची नाळ अधिक घट्ट करण्याचा हा अफलातून प्रयोग ‘कूल’ ठरतो आहे. भजन क्लबिंग कोण्या एका व्यक्तिने किंवा क्लबने सुरू केलेली संकल्पना नाही तर भारतीय युवावर्गाच्या बदलत्या प्राथमिकता त्यातून स्पष्ट दिसतात. आपली सांस्कृतिक ओळख, अध्यात्माचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणारी जेन झी! परंपरा आणि आधुनिक विचारांना जोडणारा पूल म्हणजे भजन क्लबिंग! वरवर पाहता कोरडी, असंवेदनशील वाटणाऱ्या पिढीसमोर फास्ट फॅशन आणि सांस्कृतिक बदलांमधून जाण्याचे तणावपूर्ण आव्हान आहे.
Bhajan Clubbing-trend-genz हातात भरपूर पैसा असला तरी, स्पर्धेत टिकण्याचा ‘स्ट्रेस’ आहे. जगभरातील मैत्रीची साधनं असली तरी ‘पिअर प्रेशर’ आहे. संयुक्त कुटूंबाचे आदर्श केवळ ऐकलेल्या या पिढीपुढे ‘कल्चरल हसल’ आहे. नातेसंबंधांच्या वेगळ्या अडचणी आणि समाजाकडून अपेक्षा आहेत ज्या जेन झीच्या पचनी पडत नाहीत. प्रत्येक विचार बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहणारी ही पिढी, या नव्या मार्गाने तणावमुक्ती साधण्याचा प्रयत्न करतेय. तणावातून मुक्तीसाठी अंमली पदार्थांना स्वयंस्फूर्तीने नकार देणारं हे युवावर्गाचे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
Bhajan Clubbing-trend-genz अशा ताणतणावाला तोंड देताना, ठेक्यावर गायली जाणारी भजनं, त्यांना एक आश्वासक ‘ऑल इज वेल’चा अनुभव देत आहेत. क्लबसोबतच कॉलेज कँटीन, हॉस्टेल्स, कॉफी शॉप्स, लाऊंज, सोसायटीचे पार्क किंवा जिमसारख्या ठिकाणी, अगदी लहान हॉल बुक करून, युवकांचे ग्रुप्स आधुनिक वाद्यांच्या ठेक्यावर ईशनाम घेत, भक्तीत लीन होताना दिसत आहेत. हनुमान चालीसा, शिवतांडव आणि राधाकृष्णाच्या गीतांसह विविध श्लोक-मंत्र गात नाचणाèया युवकांचे व्हिडीओज सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
Bhajan Clubbing-trend-genz ‘भजन आणि भोजन करताना संकोच करायचा नाही,’ या संकल्पनेवर धुंद होऊन भजन करणारी जेन झी, जीवन आणि अध्यात्माची सांगड घालून खरा आनंद घेते आहे. उपासनेचे हे माध्यम नवीन असले तरी, ईशभक्तीकडे नेणारेच आहे. यात नव्या पिढीसोबतच ‘मिलेनियल्स’ म्हणून ओळखली जाणारी मागच्या शतकातील पिढीही त्याच उत्साहाने सहभागी होते आहे. या नव्या माध्यमातून युवा पिढी अध्यात्माशी आपले नाते टिकवून आहे. माध्यम बदलले असले तरी त्यामागची भावना, श्रद्धा आणि भक्ती सकारात्मकता प्रदान करणारीच ठरावी.
9850339240