मुंबई,
Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाला आहे आणि ही उत्सुकता अखेर संपली आहे. बिहारमध्ये एनडीएने जोरदार विजय मिळवला आहे, तर महाआघाडीला, विशेषतः काँग्रेसला, मोठा धक्का बसला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सर्वाधिक 95 जागांवर आघाडीवर आहे आणि बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नितीशकुमार यांची जेडीयू आहे, जी सध्या 82 जागांवर आघाडीवर आहे. तर एलजेपीलाही या निवडणुकीत यश मिळाले असून 20 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाआघाडीचे मतदार फार मागे राहिले आहेत. महाआघाडीचे उमेदवार फक्त 30 जागांवर आघाडीवर आहेत, तर सात जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत. काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे; काँग्रेसचे उमेदवार अवघ्या तीन जागांवर आघाडीवर आहेत.
या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे, जी चर्चेचा विषय बनली आहे. रोहित पवार म्हणाले, “हरियाणा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनता इंडी आघाडीकडे झुकली होती. हे पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंग दरम्यान पहिला एक तास पोस्टल मतदान प्रमाणेच राहिला, परंतु पुढील दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजप आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आले. आज बिहार निवडणुकीच्या निकालात देखील त्याच पद्धतीचे चित्र दिसत आहे. या निकालामुळे मतदान मोजणीत घोळ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या बुजगावण्या, यंत्रणा आणि निवडणूक आयोगामुळे लोकशाही आणि संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा प्रवास गुवाहाटीपासून सुरतसारखा झाला तसाच हरियाणा आणि बिहारमध्ये निकाल लावण्याचा प्रवास दिसत आहे. हि निवडणूक थेट बिहारच्या जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे.”
रोहित पवार यांनी पुढे म्हटले, “तेजस्वी यादव यांना त्यांच्या सभांमध्ये मिळालेला प्रतिसाद, युवांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बघता, आजचा निकाल काहीही असला तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तेजस्वी यादवच आहेत, यात तिळमात्र शंका नाही.”
या निकालाने बिहारमधील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला असून, महाआघाडी फक्त 30 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे सिद्ध केले आहे.