बोरी तुळजापूर महामार्गासाठी २० कोटी; केळझरचा होणार कायापालट

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
डॉ. प्रमोद लाखे
केळझर, 
keljar-will-be-transformed : गेल्या काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या बुटीबोरी तुळजापूर मार्ग गावाबाहेरून केल्याने केळझर येथील रौनक कमी झाली होती. बुटीबोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील ऐतिहासिक नगरी केळझर (एकचक्रनगर ) मधुन जाणार्‍या महामार्गाच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी २० कोटी ३२ लाखाचा निधी मंजूर केले आहेत. त्यामुळे विदर्भातील अष्टविनायकामधील एक असलेल्या सिद्धी विनायकाच्या केळझरचा कायापालट होणार आहे.
 
 
k
 
बुटीबोरी तुळजापूर बायपासमुळे या सर्वधर्मीय तिर्थक्षेत्राचे महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. बायपासमुळे येणार्‍या पर्यटकांची संख्या घटली आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांचा थांबा असुनही गावात अनेक बसेस येत नाहीत. त्यामुळे येथील सर्व प्रकारच्या व्यवसायांवर मोठया प्रमाणात परिणाम झाल्याविषयीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नितीन गडकरी यांना दिली. त्याची दखल घेऊन अंतर्गत रस्ता ३. ४३० किमीसाठी निधी मंजूर केला. यात मुख्य मार्गाचे सिमेन्टीकरण, विस्तारीकरण, सौंदर्यीकरण, ड्रेनेजसाठी नाल्या, विद्युतीकरण, रस्ता दुभाजक आदी कामांचा समावेश आहे. या कामाची निविदा २५ ऑगष्ट रोजी निघाली आहे. सन २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. केळझरमध्ये येणार्‍या रोज बसेस व खाजगी वाहनांची संख्या शंभरावर आहे. वेगवेगळ्या आगाराच्या बसेस व खाजगी वाहने रोज ३०० ते४०० विद्यार्थी व प्रवाशांची ने आण करते. या मार्गामुळे गावात सहज वाहने येऊ शकतील. येणारे पर्यटक व प्रवाशांची सोय होऊन व्यवसायांना सुद्धा सुगीचे दिवस येतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गावाच्या वैभवात सुद्धा भर पडणार आहे.
 
 
या रस्त्यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिल्या बद्दल केन्द्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मा डॉ पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, भाजपा वर्धा जिल्हा अध्यक्ष संजय गाते यांचे केळझर जिप सर्कल मधील नागरिकांनी आभार मानले.