चंद्रपूर,
damodhar-mantri : चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील जनतेची ‘पुणे व मुंबईसाठीच्या दैनंदिन रेल्वे गाडी’ची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी आता समाजमाध्यमावर तुफान राडा होतोय. अशावेळी ‘पुणे व मुंबई रेल्वेगाडीचा विषय समाजमाध्यमावर पेटला!’ या मथळ्याखाली शुक्रवार, 14 नोव्हेंबरल तरूण भारतने बातमी प्रकाशित करताच, चंद्रपूर रेल प्रवासी सेवा संस्था ‘एक्शन मोड’मध्ये आली. 6 डिसेंबरपर्यंत या दोन्ही गाड्यांचा विषय मार्गी लागला नाही, तर संस्थेकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, प्रसंगी आम्ही उपोषण करू, अशी घोषणा संस्थेचे कार्याध्यक्ष दामोधर मंंत्री यांनी केली.

येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पोशट्टीवार यांनी, बुधवारी समाजमाध्यमावर एक वक्तव्य प्रसारित केले होते. त्यात त्यांनी, ‘‘ चंद्रपूरच्या नेत्यांनी चंद्रपूर ते पुणे व चंद्रपूर ते मुंबई अशा दैनंदिन रेल्वेगाडीसाठी आंदोलन करावे. आम्ही जनता पूर्ण समर्थन देऊ’’, असे लिहिले. ही ‘पोस्ट व्हायरल’ होताच एका दिवसात पाहता पाहता दिड हजाराच्यावर जळजळीत प्रतिक्रियांचा पाऊस समाजमाध्यमावर झाला. तरूण भारतने त्यावर बातमी करताच, मंत्री यांनी संस्थेची बाजू विशद केली.
दामोधर मंत्री म्हणाले, चंद्रपूर परिसरातून खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे-मुंबईकडे प्रवास करतात. नोकरदारही मोठया संख्येत आहेत. शिवाय व्यापारी मुंबई-पुण्यात जात-येते असतात. त्यांना तिकडे जायला व यायला दररोज रेल्वे गाडी नसल्याने नाईलाजाने टॅ्रव्हल्सचा धोकादायक प्रवास करावा लागतो. शिवाय, सणासुदीच्या दिवसात हे टॅ्रव्हल्सवाले अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन त्यांना लुटतात. ही समस्या आजची नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आम्ही या मागणीसाठी सातत्याने प्रयत्नरत आहोत. आमदार, खासदार, मंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी तथा महाव्यवस्थापकांपर्यंत जवळपास 100 च्यावर पत्रव्यवहार केला. शेवटी 14, 15 व 16 मार्च 2023 या तीन दिवसांत आम्ही आंदोलन केले. शेवटी आम्हाला अटक करणार असल्याने आणि ठोस आश्वासन दिले गेल्याने आम्ही तेव्हा आंदोलन मागे घेतले. पण तरीही या मागणीचे काहीच झाले नाही.
तिसरी रेल्वे लाईन होईस्तोवर पर्याय नाही!
खरे तर, पुणे व मुंबईला जाणार्या मार्गावर दोनच रेल्वे ट्रॅक आहेत. हे दोन्ही मार्ग खुप व्यस्त असतात. कारण त्यावर मोठ्या संख्येत मालगाड्या, प्रवासी गाड्या धावतात. मालगाड्या चालवणे रेल्वेला कधीही लाभदायक आहे. त्यामुळे रेल्वे व्यवस्थापन मालगाड्या कमी करीत नाही. जोवर एखादी तरी मालगाडी कमी होत नाही, तोवर या मार्गावर नवी गाडी धावणे शक्य नाही. ही मागणी प्रतिष्ठा पणाला लावून राजकीय नेते मार्गी लावू शकतात. पण तसे आजवर झाले नाही. मागे बल्लारपूरला 11-12 कोटी खर्च करून पीट लाईन तयार केली गेली. त्यामुळे बल्लारपुरात टर्मिनल पाईंट तर झाले. मात्र, मुंबई-पुण्यासाठी नव्या गाडीची घोषणा झाली नाही. त्यामुळे पीट लाईनचा खर्चही व्यर्थ गेला. या दोन्ही शहरांतून सद्यस्थितीत असणारी गाडी वर्धापर्यंत वेगाने येते. मात्र, त्यानंतर चंद्रपूर-बल्लारपूरला यायला तासन्तास लावते. त्याचे कारणही या मालगाड्या आहेत. रेल्वे मालगाड्या कमी करीत नाही आणि नवी गाडी या मार्गावर सोडत नाही, हीच खरी समस्या आहे, अशी वास्तविक प्रतिक्रिया दामोधर मंत्री यांनी व्यक्त केली.