जिल्हास्तर इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा थाटात समारोप

-इन्स्पायर अवार्ड म्हणजे मुलांना संशोधन करण्यासाठीची प्रेरणा : रवींद्र काटोलकर -11 बालवैज्ञानिकांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून शंभरावर बाल वैज्ञानिकांनी प्रदर्शित केलेल्या प्रतिकृती मूलभूत संशोधन, प्रायोगिक संशोधन व कृती संशोधन या तिन्ही प्रकारच्या होत्या. या प्रदर्शनात मुलांनी सहभागी होणे हीच त्यांच्यासाठी मोठी उपलब्ध आहे. एखाद्या समस्येचं उत्तर म्हणून मला काय वाटतं ते इतरांना सांगण्याची ही संधी असते. मूळात हे इनोवेशन किंवा नवोन्मेष प्रोत्साहित करणारे ‘इन्स्पायर अवार्ड’ म्हणजे मुलांना संशोधनासाठीची प्रेरणा होय, असे प्रतिपादन यवतमाळचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी येथे केले.
 
 
y14Nov-Inspire
 
भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद, यवतमाळ तथा विशुद्ध विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तर इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
 
 
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुकाराम भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदरआभाळे, एनआयसी दिल्लीच्या शास्त्रज्ञ तथा परीक्षक शिवाणी सिंग, नानकीबाई वाधवानी महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता वेणूरकर, एम् बी. खान ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा गुल्हाने, विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
 
 
समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुकाराम भिसे यांनी बोलताना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होत असल्याचे सांगितले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुण रुजवताना शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे असे म्हटले. सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वेश मोहरील या विद्यार्थ्याने व्यवस्थांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या परीक्षक एनआयसी च्या शास्त्रज्ञ शिवाणी सिंग यांनी इन्स्पायर अवार्डचे काम कसे चालते याविषयी माहिती दिली.
 
 
प्रारंभी राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या संगीत शिक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. समापन समारंभाचे संचालन सायली मुळे यांनी केले. विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
 
11 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
 
 
यावेळी अकरा विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर निवडण्यात आल्या. त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 1) खुशी बाबुलाल राठोड, जिजामाता गर्ल्स हायस्कूल नेर, 2) अविष्कार प्रवीण धाबर्डे, लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ, 3) अभिनव संदीप उरकुडे, स्व. ईश्वर देशमुख सैनिक विद्यालय दिग्रस जि. यवतमाळ, 4) नंदिन राजेंद्र मस्के, कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद, 5) संचिता नारायण कांबळे, विवेकानंद विद्यालय, पळशी जि. यवतमाळ, 6) निकिता राजू भगत, संमती ज्ञानमंदिर, कारंजा लाड जि. वाशिम, 7) अद्वैत राजेश शेंडेकर, जेसी हायस्कूल कारंजा जि. वाशिम, 8) ईश्वरी रामेश्वर मुळे, शोभनाताई नरेंद्रकुमार चवरे विद्यालय वाशीम, 9) विराज संदीप शिंदे, पोदार इंटरनॅशनल स्कूल वाशिम, 10) स्वरा सुभाष कुलकर्णी, कोठारी माध्यमिक गर्ल्स स्कूल नांदुरा जि. बुलढाणा, 11) सर्वेश भालचंद्र मोहरील, संताजी कॉन्व्हेंट, मेहकर जि. बुलढाणा.