मुलांच्या मासिकातून सुसंस्कारित कार्य

डॉ. अनुराधा रिधोरकर यांचे प्रतिपादन विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
anuradha-ridhorkar : सोशल मिडीयाच्या काळात अनेक बालमासिक कायम असताना मुलांना सुसंस्कारित करण्याचे कार्य लहान मुलांच्या मासिकातून होत आहे. याशिवाय एआयच्या विश्वात प्रत्येक पालकांनी सुध्दा आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी प्राधान्यक्रम देणे आवश्यक झाले असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा रिधोरकर यांनी केले.
 
 
14nov3576
 
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने बालक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राष्ट्रभाषेच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर चौक येथे आयोजित सत्कार प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी प्रसिद्ध समीक्षक, विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे , मुलांचे संपादक जयंत मोडक, हितवादच्या उपसंपादक आसावरी शेणोलीकर, डॉ. गिरीश गांधी, किशोर कन्हेरे, प्रगती पाटील, अतुल दुरगकर,शुभदा फडणवीस, रूपाली मोरे आदी उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते जयंत मोडक व आसावरी शेणोलीकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
 
 
मुलांच्या मासिकाचे योगदान
 
डॉ. अनुराधा रिधोरकर म्हणाल्या, लहान मुले शिकायला लागल्यानंतर व त्याला वाचता येऊ लागल्यानंतर वाचनातून त्याला अनेक गोष्टी कळत असतात, अशी साधने आज दुर्मिळ होत आहेत. बालवयात योग्य संस्कार करण्याचे कार्य प्रत्येक पालक करीत असताना लहान मुलांच्या मासिकाचे सुध्दा योगदान आहे. बाल साहित्याचे वाचन, किलबिल गोष्टी, किलबिल कविता, किलबिल गप्पा अशा प्रकारचे बालसाहित्य असल्यास मुलांना वाचनाची आवड निर्माण होते.
 
बालसाहित्य म्हणजे उत्तम संस्काराचे दीपस्तंभ
 
 
डॉ. अक्षयकुमार काळे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, बालवयात संस्कार करण्याचे ईश्वरीय कार्य मासिकाने केले आहे. मुलांसाठी नियमितपणे मासिक काढणारे संपादक वाचन संस्कृती जपण्यासाठी झटत आहे. ज्ञानवर्धक माहिती देण्याचे कार्य बालमासिकातून होत असल्याने मुलांच्या ज्ञानात भर पडते. वाचनाची सवय लावण्यात योगदान कधीच विसरता येणार नाही. मुलांच्या कल्पना शक्तीला पंख देण्याचे कार्य बालसाहित्यातून होत आहे. एकंदरीत बालसाहित्य म्हणजे उत्तम संस्काराचे दीपस्तंभ होय. याप्रसंगी जयंत मोडक, आसावरी शेणोलीकर, शांभवी देशपांडे, साईश्री हेडा हीने सुध्दा मनोगत व्यक्त केले.