ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Kamini Kaushal passes away भारतीय चित्रपटसृष्टीला आपल्या साध्या, देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि प्रभावी अभिनयाने भुरळ घालणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार वाढलेल्या आजारांमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांच्या कुटुंबीयांनी अंतिम क्षणांबद्दल गोपनीयता पाळली आहे.
 
 
Kamini Kaushal passes away
 
पत्रकार विकी लालवानी यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. १६ जानेवारी १९२७ रोजी लाहोरमध्ये जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी जवळपास शंभर वर्षांचे आयुष्य गाठले. ब माहितीनुसार, ९३ वर्षांपर्यंत त्या कुठल्याही औषधावर नव्हत्या. साधेपणा, संतुलित जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या दीर्घायुष्याची मोठी रहस्ये मानली जातात. कामिनी कौशल यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात १९४६ मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून केली. या चित्रपटाला पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळाल्यामुळे त्या थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास तब्बल सात दशकांपर्यंत अखंडपणे सुरू राहिला.
 
 
‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदी के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम कोरल्या गेल्या. १९५० आणि ६० च्या दशकांतही त्यांनी ‘झंझार’, ‘जेलर’, ‘नाईट क्लब’, ‘गोदान’ यांसारख्या चित्रपटांत उल्लेखनीय भूमिका साकारल्या. सुबक चेहरा, सहजता आणि भावपूर्ण अभिनय यांच्या जोरावर त्या काळातील बॉलिवूडच्या अग्रगण्य तारकांपैकी एक बनल्या. कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णकाळाचा उजळ तारा कायमचा मावळला आहे. त्यांच्या अप्रतिम कलाकृती, अमोघ अभिनय आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे त्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात सदैव अजरामर राहतील.