जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा प्रवेश!

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Lakshya Sen enters the semi-finalsभारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने जपान मास्टर्स स्पर्धेत आपला विजयरथ पुढे नेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आतापर्यंत अप्रतिम फॉर्ममध्ये खेळत असलेल्या लक्ष्यने उपांत्यपूर्व सामन्यात माजी विश्वविजेता लोह कीन यूला धक्का देत सरळ सेटमध्ये पराभूत केले. केवळ ४० मिनिटांत लक्ष्यने २१-१३ आणि २१-१७ अशी मात नोंदवत उपांत्य फेरीचे तिकीट आपल्या नावावर केले.
 
 
Lakshya Sen enters the semi-finals
 
सामन्याच्या सुरुवातीलाच लक्ष्य सेनने आक्रमक खेळ करत लोह कीन यूवर दबाव निर्माण केला. पहिल्या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर लक्ष्यने ब्रेकला ११-८ अशी आघाडी घेतली आणि नंतर सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याने चांगले पुनरागमन करत सामना ९-९ असा समसमान केला. तरी निर्णायक क्षणी लक्ष्यने उत्कृष्ट कौशल्य व नियंत्रण दाखवत सेट आणि सामना दोन्ही जिंकले.
 
जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या लोह कीन यूविरुद्ध लक्ष्य सेनची ही सातवी विजयी नोंद आहे. दोघांमध्ये झालेल्या १३ सामन्यांत लक्ष्यचे वर्चस्व कायम राहिले आहे. आता उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा सामना जपानच्या केंटा निशिमोटोविरुद्ध होणार आहे, जो सध्या जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. २०२५ वर्षात लक्ष्य सेनने चांगली कामगिरी केली असून, हाँगकाँग ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. जपान मास्टर्सच्या ४७५,००० अमेरिकन डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत आता त्याचे लक्ष्य विजेतेपदावर असेल.