मोर्शीत ६३ वर्षात ७ महिला न. प. अध्यक्ष

यंदाचे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
मोर्शी, 
womens-municipal-council-president : मोर्शी नगरपालिकेत आतापर्यंत ६३ वर्षाच्या काळात ७ महिला नगराध्यक्ष होऊन गेल्या. यावेळी मोर्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहे.
 
 
morshi
 
पहिली महिला नगराध्यक्षा होण्याचा मान भारतीय जनता पार्टीच्या सुमंगला श्रीराव यांना मिळाला होता. त्यांनी १७ नोव्हेंबर१९९६ ते १६ डिसेंबर १९९६ या काळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामदास पाटील यांनी १७ डिसेंबर१९९७ ते २७ ऑगस्ट १९९८ दरम्यान नगराध्यक्ष पद भूषविले होते. राजाभाऊ बेले यांनी ९ सप्टेंबर १९९८ ते १६ डिसेंबर १९९८ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. विठ्ठल चौधरी यांनी १७ डिसेंबर १९९८ ते २७ डिसेंबर १९९९ या काळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. कैलास फंदे यांनी ५ जानेवारी २००० ते १६ डिसेंबर २००१ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक हरिभाऊ रोडे यांनी १७ डिसेंबर २००१ ते१६ डिसेंबर २००६ सलग पाच वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले होते. दुसरी महिला नगराध्यक्षा होण्याचा मान रेखा कोडापे या महिलेला मिळाला होता.
 
 
त्यांनी १७ डिसेंबर २००६ ते १५ जुलै २००८ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर विमल उमाळे यांनी १९ जुलै २००८ ते १६ जून २००९ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या विनोद ढवळे यांनी १६ जून ते २७ डिसेंबर २०११ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर शिला अशोक रोडे यांनी २८ डिसेंबर २०११ ते १७ सप्टेंबर २०१३ या दरम्यान नगराध्यक्ष पद भूषविले होते. काँग्रेसच्या तिकीटवर नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या रेशमा नितीन उमाळे यांनी ३० सप्टेंबर २०१३ ते ५ जुलै २०१४ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. प्रतिभा कटिस्कर यांनी १६ ऑगस्ट २०१४ ते ५ डिसेंबर २०१५ या कालखंडात नगराध्यक्ष पद भूषविले होते.
 
 
त्यांना पुन्हा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने त्यांनी ३० डिसेंबर २०१५ ते २८ डिसेंबर २०१६ या दरम्यान नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिला अशोक रोडे विजयी झाल्याने त्यांनी २८ डिसेंबर २०१६ ते १० जून २०१९ पर्यंत च्या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जितेंद्र गेडाम यांनी १४ जून २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ या कार्यकाळात नगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मेघना मोहन मडघे मोर्शीकर जनतेमधून निवडून आल्याने त्यांनी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत नगराध्यक्ष पद भूषविले होते. ४४ व्या नगराध्यक्षा पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकालानंतरच कळणार आहे.