नागपूर,
mp-cultural-festival-2025 : ख्यातनाम संगीतकार विशाल भारद्वाज आणि सुप्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांच्या अतिशय शांत, संयमी आणि तितक्याच सुमधुर गीतांनी शुक्रवारची संध्याकाळ संस्मरणीय ठरली.
हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ मध्ये शुक्रवारी आठव्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात ख्यातनाम संगीतकार विशाल भारद्वाज आणि सुप्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट भव्य स्वरूपात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात रेखा भारद्वाज यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘तेरे इश्क में’ या गीताने केली. “प्रकृतीकडून जे काही मिळते ते पुन्हा धरतीला समर्पित करण्याचा प्रयत्न करावा,” असे म्हणत डोक्यावर टोपी परिधान करून आलेल्या रेखा यांनी सुफी पद्धतीने ईश्वराचे स्मरण करण्याचा हा माझा मार्ग आहे,” अशा भावना व्यक्त करत रसिकांना आध्यात्मिक सुरावट अनुभवायला लावली. कैसी तेरी खुदगर्जी, कबीरा मान जा, वो जो अधुरी सी याद बाकी है, सासुराल गेंदा फुल, या चिमण्यांनो यांसारखी लोकप्रिय गीते सादर करत त्यांनी मोहक वातावरण निर्माण केले.
यानंतर संगीतकार विशाल भारद्वाज यांचे आगमन होताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. “नागपूर खूप सुंदर शहर आहे आणि इथले रसिकही अप्रतिम आहेत,” असे सांगून त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. थोडे भिगे भिगे, थोडे नम है हम, पहली बार मोहब्बत की है अशा मनाला भिडणाऱ्या गीतांनी त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आपल्या प्रवासातील स्मरणीय क्षण उलगडताना ते म्हणाले, “माचिस माझा पहिला चित्रपट होता. लता मंगेशकरजींसोबत पहिल्यांदा काम करताना मी खूप नर्व्हस होतो. मला धीर देत त्या म्हणाल्या, ‘मी लता मंगेशकर आहे हे विसरा, मी नवीन आहे असे समजा.’ त्यानंतर आम्ही पानी पानी रे हे गाणे रेकॉर्ड केले.”
त्यानंतर ऐसी उलझी नजर, दिल तो बच्चा है जी यांसारख्या लोकप्रिय रचनांनी मैफलीत रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमात भारद्वाज दांपत्याच्या सुरेल गायनाने नागपूरकर रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला.
आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, नवभारत समूहाचे प्रमुख निमेश माहेश्वरी, भास्कर समूहाचे प्रमुख सुमित अग्रवाल, देशोन्नती समूहाचे प्रमुख प्रकाश पोहरे, विदर्भ की बात प्रमुख अरुण कोटेचा, माजी पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय, लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली. स्थानिक कार्यक्रमाचे रिचा सुगंध व अमन चौधरी तर मुख्य कार्यक्रमाचे बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
ट्रान्सजेंडर कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण
ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ममत्व फाउंडेशनच्या शिवमुद्रा डान्स ग्रुपने महोत्सवात आज अप्रतिम सादरीकरण केले.
किन्नरांच्या जीवनाशी संबंधित पौराणिक कथा नृत्याचे माध्यमातून कलाकारांकडून प्रस्तुत करण्यात आल्या. यात अर्धनारीनटेश्वर, द्रौपदी वस्त्रहरण, श्रीकृष्ण रासलीलेतील भगवान गोपेश्वर यांचे नृत्य, माँ यल्लमाचा जोगवा यांचा समावेश होता. यावेळी सर्व कलाकारासह कोरिओग्राफर जय, सूत्रसंचालक स्वरा करंजगावकर, संस्थेच्या अध्यक्ष श्रद्धा जोशी यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.