नागपूर,
nagpur-book-festival : “नागपूर हे सध्या सांस्कृतिक आणि चळवळीचे केंद्र बनले आहे. ‘नागपूर पुस्तक महोत्सव’ या उपक्रमामुळे ते विचारांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल,” असा आशावाद रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी व्यक्त केला. नागरिकांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भरपूर पुस्तके विकत घेण्याचे व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, नॅशनल बुक ट्रस्ट आणि झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “नागपूर पुस्तक महोत्सव २०२५” च्या स्थळाचे भूमिपूजन शुक्रवारी रेशीमबाग मैदानात मंगलमय वातावरणात पार पडला. कुदळ मारून आणि नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
हा महोत्सव दिनांक २२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान भव्य आयोजनात होणार आहे. कार्यक्रमाला अतुल मोघे यांच्यासह आमदार संदीप जोशी, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, रा. स्व. संघ नागपूर महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, भाजपा महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, झिरो माईल युथ फाउंडेशनचे संचालक प्रशांत कुकडे, समय बनसोड, कल्याण देशपांडे, नागपूर विद्यापीठाचे डॉ. राजू हिवसे आणि सी. पी. बेरार संस्थेचे अध्यक्ष ॲड. अशोक बनसोड उपस्थित होते.
यावेळी डॉ. अतुल वैद्य म्हणाले, “पुस्तके ही ज्ञानसंपदा तर आहेतच, पण ती चिरंतन संस्कारांची जपणूकही करतात. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पुस्तक प्रदर्शन अत्यावश्यक आहे.”
आमदार संदीप जोशी यांनी, “हा मेळा केवळ नागपूरपुरता मर्यादित न राहता देशभरात लोकप्रिय व्हावा यासाठी प्रयत्न करू,” असे सांगितले. दयाशंकर तिवारी यांनी म्हटले, “पुस्तक वाचणे म्हणजे केवळ शब्द वाचणे नव्हे, तर विचार आत्मसात करून चिंतन करणे. महोत्सव या प्रक्रियेला चालना देईल.” समय बनसोड यांनी महोत्सवाचा विस्तृत परिचय देत उपक्रमांची माहिती मांडली. नागपूरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहराची वाचनसंस्कृती नव्या उंचीवर जाईल, अशी अपेक्षा आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आली.
नागपूर पुस्तक महोत्सव 2025 : ठळक वैशिष्ट्ये
१. देशभरातील ३२५ प्रकाशकांचा सहभाग
२. १५ लाख पुस्तकांवर सवलत
३. २२ सप्टेंबरपासून शहरातील शाळांमध्ये “नागपूर पुस्तक परिक्रमा”
४. पाच व्हॅनद्वारे ग्रामीण भागात “नागपूर पुस्तक वारी”
५. राज्य शासन, मनपा, सहा विद्यापीठे, नागपूर मेट्रो, स्थानिक प्रकाशक, वाचनालये, साहित्य संस्था यांचा सहभाग
६. लिटरेचर फेस्टिवल, युवा लेखक समिट, पोस्ट कार्ड अभियान यांसारखे आकर्षक उपक्रम