नूतन भारत विद्यालयात शिक्षा प्लस’ उपक्रमाची सुरूवात

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
nutan-bharat-vidyalay : भारतीय विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन भारत विद्यालयात हेल्पलिंक चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शिक्षा प्लस’ या कौशल्याधारित महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी उत्साहात झाला. शिक्षण विभाग (माध्यमिक), नागपूरचे अधीक्षक प्रमोद नाट यांच्या हस्ते डिजिटल वर्गखोल्यांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोळवलकर गुरुजी स्कूल, पुणेचे संचालक मिलिंद कांबळे, हेल्पलिंक फाउंडेशनचे संस्थापक अनिल बाफना, करिअर काउन्सेलर संजय कुलकर्णी, संस्थेचे सचिव रमेश बक्षी, मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक यांच्यासह संस्थापक हेमंत लोढा, प्रभा लोढा, कीर्ती कल्याणी, सलोनी बागवान तसेच रवींद्र लष्करे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
 

ngp 
 
“शिक्षा प्लस – अ स्किल बेस्ड इनिशिएटिव्ह” या अभ्यासक्रम पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याचबरोबर गोळवलकर इंटरनॅशनल एआय स्कूल या अभिनव संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. हेल्पलिंक फाउंडेशनतर्फे शाळेत ‘स्पोकन इंग्रजी’ प्रशिक्षणाचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. संजय कुलकर्णी यांनी “देशप्रेम केवळ विषयज्ञानातून नव्हे तर जबाबदारी, स्वच्छता, मातृभाषेची जाण आणि सामाजिक भान यातून प्रकट होते” असे मत व्यक्त केले. तर प्रमोद नाट यांनी “चांगले नागरिक घडविण्यात शिक्षणाची भूमिका अनन्यसाधारण असून याच विद्यार्थी भविष्यात देश घडवतील” असे सांगितले. मुख्याध्यापिका डॉ. बडवाईक यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तकाबरोबरच कौशल्यांचेही शिक्षण आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. ‘शिक्षा प्लस’ उपक्रमांतर्गत इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्व विकास, संवादकौशल्य, व्यावहारिक ज्ञान अशा प्रशिक्षणांचा समावेश केला असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश आहे.