कोलकाता,
Pant Dhoni catach कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतने घेतलेला एक जबरदस्त कॅच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण भारतीय गोलंदाजांनी भेदक खेळ करत 120 धावांवर त्यांची पाच विकेट टिपली. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत हा या सामन्यात खऱ्या अर्थाने चमकला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एडन मार्करामचा कॅच घेताना त्याने हवेत उडी मारत केलेली कमाल पाहून प्रेक्षकांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली.

13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू मार्करामच्या बॅटचा कडा घेत सरळ मागे गेला आणि पंतने क्षणाचाही विलंब न करता उंच उडी मारत तो कॅच सुरक्षित घेतला. मार्कराम 31 धावांवर बाद झाला. या अप्रतिम कॅचनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पंतचे भरभरून कौतुक केले. त्याची ही उपस्थिती आणि चपळाई पाहून ‘फ्लाइंग पंत’ अशीही चर्चा सुरू झाली आहे. जवळपास चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंतने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे त्याला दीर्घ काळ मैदानापासून दूर राहावे लागले होते. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकाही त्याने गमावल्या होत्या. आता पूर्ण फिट होऊन तो संघात परतला आहे आणि पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या कौशल्याची पुन्हा एकदा जोरदार छाप पाडली आहे.