अखेर ताडोबाच्या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर

वर्षभरापासून होते प्रलंबित

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर,
Sahyadri tiger of Tadoba tigress एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात 200 च्यावर वाघ आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षही आहे. तर, दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची वानवा आहे. अशावेळी ताडोबाचे वाघ तिकडे स्थलांतरित करण्याच्या योजनेवर 2024 पासूनच विचार सुरू होता. आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (एनटीसीए) अनुमती मिळताच, 12 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून यशस्वीरित्या पकडलेल्या ‘टी 20 एफएस 2’ या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. अत्यंत अनुकूल नैसर्गिक वातावरणात वाघांची संख्या झपाट्याने वाढलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघिणींना साधारणतः मे 2024 मध्येच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची योजना होती. पण हा प्रकल्प रखडत गेला. आधी कालबद्ध कार्यक्रम आखून तिकडे तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न झालेत. सागरेश्वर अभयारण्यातून तृणभक्षक प्राणी सह्याद्रीमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
 
 
Sahyadri tiger of Tadoba tigress
 
 
भारतीय वन्यजीव संस्थेने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विष्ठेच्या 44 नमुन्यांचे विश्लेषण केले होते. त्यातील सात नमुने हे वाघांचे आढळले. मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. ते कधीच स्थिरावले नाही. खरे तर, 21-22 वाघ सामावून घेण्याची क्षमता त्या प्रकल्पात आहे. एव्हाना सह्याद्री प्रकल्पात अनुकूल स्थिती तयार झाली असल्याने पहिल्या टप्प्यात दोन आणि त्यानंतर सहा असे एकूण आठ वाघ तिकडे सोडण्यात येणार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्रालयाने (एमओईएफ) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि आसपासच्या परिसरातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यास आता मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात ताडोबातील दोन प्रौढ वाघिणींची निवड करण्यात आली. त्यापैकी टी 20 एफएस 2 या वाघिणीला पकडून तिची आरोग्य तपासणी केल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात आले. ही कारवाई टीएटीआरचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत उपसंचालक (बफर) आनंद रेड्डी, मुख्यालय वन विभाग प्रमुख सचिन शिंदे, सहायक वनसंरक्षक एस. एस. दुबे, अनिरुद्ध ढगे, वनक्षेत्र अधिकारी राऊत आणि त्यांची चमू सहभागी होती.
 
 
 
आतापर्यंत तीन ठिकाणी आम्ही यशस्वी स्थलांतरण केले : शुक्ला
टीएटीआर व एसटीआर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सह्याद्री प्रकल्पात पहिल्या वाघिणीचे स्थलांतर करणे शक्य झाले. मात्र, याआधीही सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींना तसेच नवेगाव-नागझिरा अभयारण्यातही ताडोबा-व्याघ्र प्रकल्पाच्या चमुने वाघिणींचे यशस्वी स्थलांतर केले आहे, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी तरूण भारतला दिली.