ड्रग्ज रॅकेटच्या आरोपीकडून श्रद्धा–नोरावर गंभीर आरोप!

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Serious allegations against Shraddha-Nora मुंबईत उघडकीस आलेल्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना चौकशीदरम्यान महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखाने तपासात अनेक चर्चेत असलेली मोठी नावं घेतली असून त्याने भारतात आणि परदेशात आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. चौकशीत आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शेखने यापूर्वी स्वतःला दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या मुलाचा नातेवाईक असल्याचे सांगितले होते. त्याने अलिशाह पारकर, नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दीकी, ओरी उर्फ ओरहान, अब्बास मस्तान लोरी आणि इतरांबरोबर भारतात तसेच परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित केल्याचे सांगितले. या सर्व पार्ट्यांसाठी ड्रग्ज पुरवण्याची जबाबदारी स्वतःवर असल्याचेही त्याने कबूल केल्याची माहिती मिळाली आहे.
 
Shraddha-Nora
आता पोलीस यामधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपास केंद्रित करणार आहेत. या सेलिब्रिटींची नावे केवळ आरोपीच्या दाव्यावर आधारित आहेत की त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, हे प्रथम तपासले जाणार आहे. देशात किंवा परदेशात कोणत्याही ड्रग्ज तस्करांनी या लोकांसाठी पार्ट्या आयोजित केल्या का, त्यांचा अन्य तस्करांशी काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी होणार आहे. याशिवाय या पार्ट्यांना आर्थिक मदत कोणाकडून कशी मिळाली आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कचा यामध्ये काही हात होता का, याचाही तपास होणार आहे.
 
या प्रकरणातील आरोपी सलीम शेखला संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कचा ‘समन्वयक’ मानले जात आहे. मुंबईपासून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये पसरलेल्या ड्रग्ज साखळीवर त्याचे नियंत्रण असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. शेखचे नाव प्रथम फेब्रुवारी २०२४ मध्ये समोर आले, जेव्हा मुंबई गुन्हे शाखेने ७४१ ग्रॅम एमडीसह एका महिलेला अटक केली. त्या महिलेने दिलेल्या माहितीतून सलीम शेखचे नेटवर्क उघड झाले. याच धाग्याचा मागोवा घेत पोलिसांनी सांगलीतील एका रासायनिक कारखान्यावर छापा मारून १२२.५ किलो एमडी तयार करण्यासाठी लागणारी २४५ कोटींची रसायने जप्त केली. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजली असून पुढील काही दिवसांत अनेक मोठ्या नावांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा आरोपीचे दावे सत्य आहेत का आणि या नेटवर्कची व्याप्ती किती खोलवर पसरली आहे, हे शोधण्यावर भर देत आहेत.