समुद्रपूर,
three-phase-electricity : अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन हातातून गेले असून, कापसाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकर्यांची सर्व आशा रबी हंगामातील चणा, गहू, ज्वारी, तूर या पिकांवर आहे. या पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक वीज पुरवठा नियमित मिळावा, यासाठी शेतकर्यांनी गिरड येथील विद्युत महावितरण कंपनीचे अभियंता विनोद खांडरे यांच्याकडे साकडे घातले आहे.
शेती हा आमचा जीवनोपयोगी व्यवसाय आहे. शेतकरी मजुरांसोबत दिवसभर मशागतीचे काम करीत असतो, तर रात्री पिकांची निगा राखण्यासाठी शेतावर जागली करावी लागते. मात्र, सध्या रात्रीचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद असल्याने शेतकरी आणि मजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वन्य प्राण्यांची भीती असतेच. जिवावर उदार होऊन पिकांची राखण करीत असताना एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्यास जिवालाही मुकावे लागते. त्यामुळे दिवसा १२ तास थ्री फेज व रात्री किमान सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी अभियंता खांडरे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून, बाहेरील जिल्ह्यातून आलेले शेकडो मजूर शेतशिवारात झोपड्या बांधून किंवा गोठ्यात मुकामी राहतात. रात्री वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते आणि वन्यप्राण्यांच्या भीतीने हे मजूर जीव मुठीत घेऊन त्यांना रात्र काढावी लागते. अनेकवेळा रानडुकर यासारखे प्राणी शेतात शिरतात. तर कधी वाघाचा धोका असतो. त्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून रात्री शेतात वीजपुरवठा सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही शेतकर्यांचे मत आहे.
वीज पुरवठ्याच्या अभावामुळे सिंचन ठप्प झाले आहे. पिकांची वाढ खुंटत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांचा विचार करून रबी हंगामात दिवसा १२ तास थ्री फेज आणि रात्री सिंगल फेज वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
निवेदन देताना गिरडचे उपसरपंच मंगेश गिरडे, मोहगावचे सरपंच विलास नवघरे, गजानन गारघाटे, राजू डेकाटे, बलवंत चौधरी, नंदलाल गुंडे, यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.