बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल!

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Uddhav Thackeray's criticism of Congress बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच राजकीय वातावरण तापले आहे. सुरूवातीच्या कलांमधून एनडीएला बहुमताची शक्यता दिसत असून जदयू-भाजप युतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. भाजपने यंदा 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे भाजप आणि जनता दल युनायटेड यांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित शक्तीने मैदानात उतरल्याने निकालाचे चित्र वेगळे दिसत आहे.
 
 

uddhav thackeray 
 
 
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना म्हटले की, काँग्रेसने वारंवार त्या-त्या चुका केल्याने केवळ बिहारच नव्हे तर महाराष्ट्रातही त्याचे दुष्परिणाम दिसतील. पराभवातून धडा न शिकण्याची काँग्रेसची वृत्ती आता बदलली पाहिजे, असे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले. दानवे म्हणाले, महाराष्ट्रात जर काँग्रेसने योग्य वेळी निर्णय घेतला असता आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला असता, तर चित्र पूर्णपणे बदलले असते. बिहारमध्येही हीच चूक झाली. काँग्रेसने जागावाटपात मोठा हिस्सा मागितला, पण निकाल मात्र अत्यंत निराशाजनक दिसत आहे.
 
 
तेजस्वी यादव यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा उशिरा केली, ज्याचा थेट परिणाम प्रचाराच्या गतीवर झाला, असेही दानवे यांनी म्हटले. तसेच मतदार याद्यांमधील घोळ अद्याप कायम असल्याने अनेक जागांवर मतांचे नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. राज्यात महाविकास आघाडी पुढे यावी, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. मात्र जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत प्रलंबित राहिले, तर त्याचे गंभीर परिणाम निवडणूक निकालांवर होतात, असा इशाराही त्यांनी दिला. “बिहारचे राजकीय गणित आणि महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. पण काँग्रेसने निर्धाराने आणि वेळेत निर्णय घेतले नाहीत, तर तोटा सर्वांचाच होतो,” असे म्हणत दानवे यांनी काँग्रेसला थेट सुनावले.