वाशीम न.प.निवडणूकीसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
वाशीम,
Washim N.P. Election येत्या २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणूकीसाठी १४ डिसेंबर रोजी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात ५ नगराध्यक्ष तर २१ नगरसेवक पदासाठी अर्जाचा समावेश आहे. वाशीम नगर परिषद अध्यक्षपद हे इतर मागास खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. एकूण ३२ नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र, अद्यापही एकाही पक्षाने नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही.़ तसेच महायुती, महाविकास आघाडीबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झाले नाही. महायुतीमध्ये भाजपा, शिंदे सेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर मित्रपक्ष असे सर्वसाधारण चित्र वरच्या पातळीवर असले तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपा सद्या मोठ्या भावाच्या भूमीकेत वाशीम जिल्ह्यात आहे. आजघडीला वाशीम - मंगरुळनाथ मध्ये भाजपाचे श्याम खोडे तर कारंजा - मानोरा मध्ये सई डहाके हे दोन आमदार आहेत.
 
 
Washim N.P. Election
 
 
वाशीम नगर परिषद अध्यक्ष व नगरसेवकांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असल्याने पक्षश्रेष्ठीसमोर उमेदवारी देण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीतही हीच स्थिती आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शयता आहे. १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बहुतांश पक्ष याच दिवशी उमेदवारांची नावे जाहीर करुन अर्ज दाखल करणार असल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. आजपर्यत अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी आपले अधिकृत उमेदवार तूर्त जाहीर केले नाहीत.