जिल्ह्यात आली थंडीची लाट

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Cold wave : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट होत आहे. रात्रीच्या वेळी थंडीचे प्रमाण वाढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांपर्यंत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
 
ytl
 
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत. घरात आवश्यक औषधांचा साठा ठेवावा आणि रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे तसेच थंड वाèयाचा संपर्क टाळण्यासाठी प्रवास कमी करावा. शरीर कोरडे ठेवावे, ओले कपडे त्वरित बदलावेत व गरम पेयांचे सेवन करावे. वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
 
 
फ्रॉस्टबाइटच्या लक्षणांकडे लक्ष द्या जसे की, बधीरपणा, बोटे, कानाचे लोब आणि नाकाचे टोक पांढरे किंवा फिकट दिसणे. फ्रॉस्टबाइटने प्रभावित झालेल्या भागाची विशेष काळजी घ्यावी. अधिक प्रभावित वाटल्यास वैद्यकिय सल्ला घ्यावा, तसेच हायपोथर्मियाच्या बाधित व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी. हायपोथर्मिया बाधित व्यक्तीला उबदार ठिकाणी ठिकाणी ठेवावे. ब्लॅकेटचे कोरडे थर, कपडे, टॉवेल किंवा चादरी वापरून व्यक्तीचे शरीर उबदार करा. शरीराचे तापमान वाढवण्यासाठी उबदार पेये द्या. आरोग्य स्थिती बिघडल्यास वैद्यकीय मदत घ्या.
 
 
थंडीच्या काळात नागरिकांनी मद्यप्राशन टाळावे, हिमबाधा झालेल्या भागाची मालिश करू नये आणि थंडीमुळे कापत असल्यास दुर्लक्ष करू नये, कारण हे शरीरातील उष्णता कमी होण्याचे पहिले लक्षण असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच शीतलहरीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके आणि वारंवार सिंचन अथवा तुषार सिंचन करावे. लहान फळझाडांना पॉलिथिन शीट किंवा गोणी पिशव्याने झाकावे, केळीच्या घडांना सच्छिद्र पॉलिथिन पिशव्याने झाकावे तसेच तांदळाच्या रोपवाटिकांना रात्री पॉलिथिन शीटने झाकून ठेवून सकाळी काढून टाकावे, अशा सूचना दिल्या आहेत.
 
 
पशुंचे सरंक्षणासाठी त्यांना रात्री शेडमध्ये ठेवावे, कोरडे अंथरूण द्यावे, खाद्यामध्ये प्रथिने व खनिजांचे प्रमाण वाढवावे, असे सुचविले आहे. हिवाळ्यात जनावरांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 10 ते 20 टक्के प्रमाणात खनिज मिश्रण व मिठाचा समावेश करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.