अकोला,
Akola Birth Certificates शहरातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते किरिट सोमय्या शुक्रवारी (ता.१४) अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. या प्रकरणात प्रशासनाने सोमय्या यांना महत्त्वाची माहिती दिली असून अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. जन्म दाखले जमा न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली.
जिल्ह्यात नायब तहसीलदारयांच्या आदेशाने नोंदविण्यात आलेल्या ३,०४५ जन्म प्रमाणपत्रांचे आदेश रद्द करण्यात आले होते. रद्द झाल्यानंतर ही प्रमाणपत्रे परत मागविण्यात आली होती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी २,७४१ प्रमाणपत्रे नागरिकांनी जमा केली आहेत. मात्र उर्वरित ३०४ जणांनी नोटीस बजावूनही प्रमाणपत्रे परत केली नाहीत, अशी माहिती देण्यात आली. यातील चिंता वाढविणारी बाब म्हणजे २०० प्रमाणपत्रांचा कोणताच सुगावा नाही. ही प्रमाणपत्रे कोणी घेतली व कोण त्या प्रमाणपत्रांच्या आधारे अधिवास करत आहे, हेही स्पष्ट नाही. संबंधित व्यक्ती, त्यांचे पत्ते किंवा त्यांच्याकडील नोंदी यांचा कसलाच ठावठिकाणा नसल्याने ही प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. प्रशासन या २०० प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथक नेमणार असल्याचीही माहिती आहे. ज्यांनी प्रमाणपत्रे जमा केली नाहीत, अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती किरिट सोमय्या यांनी दिली.