धारणी,
tiger-kills-cows : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल पट्ट्याने वेढलेल्या धारणी तालुक्यातील ढोमनाढाणा गावालगत १४ नोव्हेंबर रोजी वाघाने प्राणघातक हल्ला करून दोन गायींचा बळी घेतल्याची घटना उघड झाली आहे. सुसर्दा येथील रहिवासी बिसराम मोती झारेकर यांच्या गायींवर हा हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
शनिवारी घटनेची माहिती मिळताच मेळघाट क्षेत्राचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झारेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व वनविभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून तात्काळ पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच वन्य प्राण्यांच्या वस्तीभागात येणार्या वाढत्या हालचालींबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अशा घटना थांबविण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. विशेष असे की, गेल्या काही महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगतच्या अनेक गावांमध्ये वाघ, बिबटे, अस्वली आदी वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत.
पाळीव जनावरांसोबतच नागरिकांवरही झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाला वारंवार सूचना करूनही या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यात विशेष यश आलेले दिसून येत नाही, अशीही तक्रार ग्रामस्थांमध्ये आहे. घटनास्थळी भेट देताना सामाजिक कार्यकर्ता वहीद खान, सरपंच लता सुनील कास्देकर, परसराम कास्देकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णकुमार पाटील, श्रीराम राजपूर, श्रीकिसन राजपूर आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकर्यांनी वनविभागाने अधिक गस्त वाढवावी, संरक्षक उपाययोजना कराव्यात आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस धोरण राबवावे, अशी मागणी केली आहे.