नागपूर,
Asphalting of roads begins स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहर सौंदर्यासाठी नागपूर महानगरपालिका विशेष प्रयत्नशील आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लांट विभागामार्फत शहरातील विविध भागांतील ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हे कार्य पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या संमतीने आधुनिक झालेल्या हॉटमिक्स प्लांटद्वारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रस्त्याच्या डांबरीकरणाचे कार्य केल्या जात आहे.

नागपूर महानगरपालिका हॉट मिक्स प्लांट विभागाने नागपूर शहर वाहतूक पोलिस शाखेशी समन्वय साधून कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. विशेष म्हणजे, डांबरीकरण केल्याजात असलेल्या मार्गावर नागरिकांना त्रास होई नये याकरिता उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहे. मनपाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ५३ किलोमीटरच्या मार्गाची माहिती संकलित करण्यात आली आहे. यात डांबर निघाल्याने खडी उघडी पडणे, पॅच तयार होणे, असमतोल चेंबरमुळे खड्डे पडणे, दुभाजक काढल्यानंतर डांबरीकरण न झाल्याने अपघात सदृश्य स्थिती, सेवा वाहिन्यांसाठी खोदकामानंतर रस्ता खचणे आणि रस्त्याला तडे पडणे आदी माहितीचा समावेश आहे. त्यानुसार, मनपाच्या दहाही झोनमध्ये काम करण्यात येत आहे.
हॉटमिक्स प्लांटतर्फे धंतोली झोन आणि हनुमाननगर झोनमध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाची सुरुवात झाली आहे. सध्या हॉटमिक्स प्लांट विभागातर्फे रामनगर चौक ते पांढराबोडी, छोटी धंतोली आणि रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलपासून ते कल्पना बिल्डिंग पर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. तसेच मनीष नगरच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. हॉटमिक्स प्लांटचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांच्या देखरेखीखाली हिंगणा हॉट मिक्स प्लांटचे उपअभियंता श्री. प्रफुल्ल आसलकर आणि स्थापत्य अभियंता सहायक श्री. विनायक चव्हाण यांच्यामार्फत प्लान्टचे कार्यान्वयन सुरू आहे. विभागाचे ५ व कंत्राटदाराचे ३ असे एकूण ८ टिप्पर ,२ पेव्हर आणि ४ रोलर वाहनांच्या सातत्यपूर्ण कार्यप्रणालीतून निर्धारित उद्दिष्ट पूर्तीसाठी कार्य केले जात आहे. याशिवाय हॉट मिक्स प्लांट विभागात विभागाचे १ आणि कंत्राटदार याचे १ असे एकूण २ जेसीबी, दोन ऑपरेटर, दोन मदतनीस, दोन मजदुर ऑपरेशनल कार्यकर्ता कार्यरत आहेत.
मनपाच्या दहाही झोनमध्ये रस्त्यांचे कार्य करण्यासाठी मनपातर्फे दोन एजन्सी निवड करण्यात आली आहे. रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्याकरिता मनपाच्या अभियंता यांचे दोन पथक तयार करण्यात आले आहे. पहिल्या पथकात उपअभियंताअभिजीत भुरे, कनिष्ठ अभियंता अंकुश कुवर व साइट सुपरवायझर राजू झाडे यांचा समावेश आहे. हे पथक धंतोली, लक्ष्मीनगर, धरमपेठ, मंगळवारी व आशीनगर या झोनमध्ये रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करणार आहे. तर दुसरे पथकात कनिष्ठ अभियंता, मनोहर राठोड, स्थापत्य अभियंता सहायक शैलेश जांभुळकर व साइट सुपरवायझर संजय बांगरे यांचा समावेश आहे या पथकाकडून हनुमाननगर, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा आणि लकडगंज झोन भागातील विविध रस्त्यांचे डांबरीकरणाच्या कामे केली जात आहे. याशिवाय हॉट मिक्स प्लांटमार्फत करण्यात येणा-या रस्त्याचे पूर्ण डांबरीकरणाचे कामाची माहितीचे संचयन अभि. सहाय्यक, मायावती डमके यांचेकडून करण्यात येते.