धारणी,
congresss-candidate-for-mayor : धारणी नगर पंचायतच्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची निवड करताना भाजपाकडे अद्याप कोणतीही निश्चिती नसताना काँग्रेसकडून राजकुमार पटेल यांनी राजकिशोर मालवीय यांना समोर करून भाजपा, प्रहार व युवा स्वाभिमानसमोर आव्हान उभे केले आहे. नामांकन भरण्याची अखेरची संधी असताना भाजपकडून उमेदवार निश्चित न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडलेले आहेत.

धारणी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत प्रथम नगराध्यक्ष म्हणून माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रजियाबी शेख यांना पदावर बसविले होते. दुसर्या निवडणुकीत प्रारंभीच राजकुमार पटेल यांनी देशातील राजकीय वातावरणाला अनुसरून काँग्रेसतर्फे राजकिशोर मालवीय या जुन्या जाणत्या काँग्रेसी कार्यकर्त्याला समोर करून पूर्ण काँग्रेस पक्ष संघटनेला विश्वासात घेतलेले दिसत आहे. दुसरीकडे लाडकी बहीण व अतिवृष्टीची मदत हे दोन उपक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा तसेच विद्यमान आमदार केवलराम काळे व नवे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांच्या लोकप्रियतेच्या आधारवर भाजपा सुद्धा मतदारांची पहिली पंसती दिसून येत आहे.
मात्र, अद्यापही नगराध्यक्ष पदाचे नाव का निश्चित झाले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर काँग्रेसमध्ये राजकुमार पटेल व पंकज मोरे याबाबत सध्या तरी यशस्वी झालेले दिसत आहेत. सध्या भाजपामध्ये विवेक नवलाखे, क्षमा चौकसे, सुनील चौथमल व अर्पण मालवीय यांची नावे चर्चेत आहेत. युवा स्वाभिमानकडून कमलसिंह ठाकूर यांचे नाव चर्चेला दिसत आहे. भाजपाचा नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे येत्या १७ किंवा १८ नोव्हेंबरपर्यंत थेट घोषित होण्याची शक्यता असल्यामुळे कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार प्रतीक्षेत आहेत.