पाटणा,
Dispute in Lalu's family बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात निर्माण झालेला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. निकाल लागल्यापासून कुटुंबातील एकामागून एक सदस्य सार्वजनिक वक्तव्य करून नवी वादळे उठवत आहेत. तेजप्रताप यादव यांनी निकालानंतर भावाला तेजस्वी यादव यांना थेट अपयशी ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या विजयाचे कौतुक केले. त्यातून सुरू झालेला तणाव आता आणखी गंभीर झाला आहे, कारण लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.

शनिवारी रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर अचानक एक पोस्ट करत राजकीय क्षेत्रात मोठे दुखणे उघड करून दाखवले. मी राजकारणातून बाहेर पडत आहे. कुटुंबाशीही नाते तोडत आहे, असे तिने एक्सवर लिहिले. इतकेच नाही, तर संजय यादव आणि रमीझ यांनी तिच्यावर दबाव आणल्याचा दावा करत, “सर्व दोष मी स्वीकारते, असेही तिने म्हटले. तिच्या या अचानक घोषणेने आरजेडीमध्ये खळबळ उडाली असून, कुटुंबातील संघर्ष आता उघडपणे सोशल मीडियावर पोहोचला आहे. पक्षाकडून किंवा कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. रोहिणी आचार्य यांचे नाव देशभरात चर्चेत आले होते, कारण २०२२ मध्ये तिने आपल्या वडिलांना लालू प्रसाद यादव यांना स्वतःची किडनी दान केली होती. सिंगापूरमध्ये झालेले हे प्रत्यारोपण यशस्वी ठरले होते. कुटुंबाशी अतूट प्रेमाने बांधलेली रोहिणी आता त्याच कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय घेत आहे, हे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. सध्या ती सिंगापूरमध्ये वास्तव्यास आहे, परंतु अलीकडे बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या प्रचारात सक्रिय होती
.
दरम्यान, रोहिणीने आपल्या पोस्टमध्ये ज्यांचा उल्लेख केलेले संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे सल्लागार आणि राजदचे राज्यसभा खासदार आहेत. अलीकडेच एका फोटोवरून रोहिणी आणि संजय यांच्या वादाला सुरुवात झाली होती. तेजस्वी यांच्या ‘बिहार अधिकार यात्रा’ बसमधील पुढील सीटवर संजय बसल्याचा फोटो व्हायरल झाला आणि रोहिणीने या जागेचे ‘अपमान’ असे वर्णन केले. ही जागा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची आहे, असे म्हणत तिने संजयवर अप्रत्यक्ष टीका केली होती. यानंतर सोशल मीडियावर रोहिणीवर टीका, ट्रोलिंग आणि आरोपांची मालिका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यादव यांनीही संजय यादव यांना ‘जयचंद’ संबोधत आरोप केले होते की, संजयच्या सांगण्यावरूनच त्यांना पक्षातून दूर ठेवण्यात आले. एकूणच, निवडणुकीतील पराभवानंतर राजदच्या घरात निर्माण झालेला अंतर्गत कलह आता सार्वजनिक पातळीवर फाटाफूट निर्माण करत आहे. रोहिणी आचार्य यांच्या घोषणेने यादव कुटुंबातील राजकीय तणावाला नवीन वळण मिळाले असून, पुढील काही दिवसांत या वादळाचे परिणाम राजकीय पटलावरही उमटणार यात शंका नाही.